जोकोविच, अल्कारेझ, पेगुला, वॉन्ड्रोसोव्हा उपांत्यपूर्व फेरीत

यूएस ओपन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मानांकित खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. पुरुष गटात सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि स्पेनचा कार्लोस अल्कारेझ या स्टार खेळाडूंनी विजय मिळवला, तर महिला गटात अमेरिकेची जेसिका पेगुला आणि झेक प्रजासत्ताकची मार्केटा वॉन्ड्रोसोव्हा यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत द्वितीय मानांकित कार्लोस अल्कारेझने फ्रान्सच्या आर्थर रिंडरखनेकवर 7-6, 6-3, 6-4 असा विजय मिळवला. हा सामना तब्बल 2 तास 12 मिनिटे चालला.

दुसरीकडे 38 वर्षीय सातव्या मानांकित सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने जर्मनीच्या जान-लेनार्ड स्ट्रफला 6-3, 6-3, 6-2 ने पराभूत केले. जोकोविचचा विजय केवळ 1 तास 49 मिनिटांत निश्चित झाला. या विजयासह ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व गाठणारा जोकोविच सर्वात वयस्क टेनिसपटू ठरला, हे विशेष. महिला एकेरीत चौथ्या मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने चीनच्या ऑलिसन लीला केवळ 54 मिनिटांत 6-1, 6-2 ने हरवत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.