
हॉकी इंडिया लीगचा पुढचा हंगाम जानेवारी 2026 मध्ये पार पडणार आहे. यावेळी लीगचे सामने दोन नव्हे तर तीन वेगवेगळ्या शहरांत खेळवले जाणार असल्याची माहिती हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी दिली.
पुरुष गटातील स्पर्धा पूर्वीप्रमाणे आठ संघांसहच सुरू राहील, मात्र महिला गटात संघांची संख्या चारवरून सहापर्यंत वाढविण्याचा विचार सुरू आहे. खास बाब म्हणजे पुरुषांचा गोनासिका संघ आणि महिला गटातील विद्यमान विजेता ओडिशा वॉरियर्स यांनी वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी नवीन संघांची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
यंदा लीगचे सामने तीन वेगवेगळ्या शहरांत रंगतील. त्यात दोन जुनी ठिकाणे कायम ठेवली जाणार असून एक नवे शहर सामील होईल. ओडिशातील भुवनेश्वर किंवा राउरकेला यांपैकी एका शहराची निवड होणार आहे. तसेच चंदिगड आणि मोहाली यांची नावे चर्चेत होती; मात्र जानेवारी महिन्यातील धुक्याच्या समस्येमुळे तो निर्णय सध्या पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. या लिलावात गोनासिका व ओडिशा वॉरियर्स संघांसह इतरांनी मुक्त केलेले खेळाडूही सहभागी होतील. हिंदुस्थान पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषक आणि आशियाई खेळांत आपला बलाढ्य संघ खेळवणार आहे. विशेष म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धा ही विश्वचषकानंतर तीन आठवड्यांनी होणार असल्याने संघांच्या तयारीवर लक्ष पेंद्रीत केले जात असल्याची माहिती तिर्की यांनी दिली.