
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माच्या वन डे कारकीर्दीच्या भवितव्याबाबत सतत चर्चा होत होत्या. विशेषतः ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याचा प्रवास संपणार का, असे प्रश्न निर्माण झाले होते. त्याच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते, मात्र हिंदुस्थानचा वन डे कर्णधार रोहित शर्माने बंगळुरूमध्ये झालेला फिटनेस टेस्टमध्ये फुल मार्क्सने पास होत सर्व शंकांना पूर्णविराम दिला आहे.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रोहितसोबतच कर्णधार शुभमन गिल, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व अन्य खेळाडूंनीही बीसीसीआयच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमी, बंगळुरू येथे फिटनेस चाचणीत भाग घेतला. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस या सर्व खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात आली. यावेळी यो-यो टेस्टसोबत ब्रॉन्को टेस्टही ठेवण्यात आली होती.
प्रसिद्ध कृष्णाचा प्रभावी परफॉर्मन्स
इंग्लंड दौऱ्यावर प्रभावी प्रदर्शन करून आलेला वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाही या फिटनेस टेस्टमध्ये सहभागी झाला. रिपोर्टनुसार, उंचीचा फायदा घेत त्याने चाचणीत उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाला प्रभावित केले. त्याचा स्कोअर अद्याप जाहीर झालेला नसला तरी तो समाधानकारक असल्याचे कळते. शुभमन गिल, जसप्रीत बुमराहसह सर्व खेळाडूंनीही ही टेस्ट पास केली असून, ते आगामी आशिया कपसाठी उपलब्ध असतील.
रोहित शर्माने सिद्ध केली फिटनेस
31 ऑगस्ट रोजी झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये कर्णधार रोहित शर्मादेखील सहभागी झाला होता. जवळपास तीन महिन्यांनंतर मैदानापासून दूर राहिल्यानंतर त्याने पुन्हा एकदा फिटनेस टेस्ट सहज पास केली आणि स्वतःची फिटनेस सिद्ध केली. टेस्टनंतर मुंबईहून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यात तो पूर्णपणे फिट दिसत होता.
सात खेळाडूंनीही पास केली नवी ‘ब्रॉन्को टेस्ट’
‘बीसीसीआय’ने टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी आता यो-यो टेस्टसोबत ब्रॉन्को टेस्टलाही अनिवार्य केले आहे. रग्बीतून घेतलेली ही शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी टेस्ट होय. मात्र, रोहित शर्माने दोन्ही टेस्ट उत्तीर्ण करत स्वतःची फिटनेस सिद्ध केली आहे. बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे झालेल्या फिटनेस कॅम्पदरम्यान रोहितने ब्रॉन्को टेस्ट आणि यो-यो टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केले. रोहितसोबतच जसप्रीत बुमरा, शुभमन गिल, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, यशस्वी जैसवाल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनीही दोन्ही चाचण्या पास करून आगामी आव्हानांसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
काय असते ब्रॉन्को टेस्ट?
ब्रॉन्को टेस्ट ही खेळाडूंच्या तीव्रता, सहनशक्ती, स्टॅमिना आणि रिकव्हरी क्षमतेला मोठे आव्हान देते. क्रिकेटमध्ये ही टेस्ट नवीन असली तरी रग्बीत ती फिटनेसचा महत्त्वाचा मापदंड म्हणून अनेक वर्षांपासून वापरली जात आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये व्यस्त वेळापत्रक आणि शारीरिक मागण्यांमुळे खेळाडूंना एलीट फिटनेस स्तराची आवश्यकता आहे. त्यासाठीच ब्रॉन्को टेस्ट तयार करण्यात आली आहे. ही टेस्ट खेळाडूंच्या कार्डिओकस्क्युलर क्षमता तसेच मानसिक ताकदीची कठोर परीक्षा घेते.