सिडकोचा डोळा आता एलिफंटावर, कामांचे टेंडर काढले; नवी मुंबईच्या भूमिपुत्रांसारखे आमचेही हाल करणार का? स्थानिक रहिवाशांचा सवाल

नवी मुंबईकरांना दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासणाऱ्या सिडकोने आता आपली वक्रदृष्टी एलिफंटा बेटावर वळवली आहे. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या एलिफंटा बेटाचा विकास करण्यासाठी सिडकोने निविदा काढल्या आहेत. या निविदांच्या माध्यमातून मास्टर प्लॅनिंग, आर्थिक मॉडेलिंगसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. सिडकोकडून होत असलेल्या या हस्तक्षेपावर एलिफंटा आणि न्हावा बेटावरील स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन नवी मुंबईतील भूमिपुत्रांसाखे आमचेही हाल करणार का, असा सवाल उपस्थित केला आहे.

एलिफंटा बेटाला जागतिक वारसा लाभलेला आहे. अशा या वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा असलेल्या एलिफंटा बेटाचा आणि पर्यटकांच्या विकासासाठी पुरातत्व विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, आयटीडीसी, बंदर विभाग, एनजीओ, स्थानिक ग्रामपंचायत आणि इतर विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात एलिफंटा बेटाचा विकास आणि पर्यटकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, गैरसोयी दूर करण्यात यश आले आहे. एलिफंटा बेट चार चौरस किलोमीटर क्षेत्रात विसावले आहे. यात सर्वाधिक जमिनीचे क्षेत्र वन विभागाच्या अखत्यारित येत आहे. तर पुरातत्व, नौदल, बंदर विभाग आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीच्याही काही जमिनीचे क्षेत्र आहे.

आता जागतिक कीर्तीच्या एलिफंटा बेटावर आता सिडकोने वक्रदृष्टी वळविली आहे. एलिफंटा व न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग आणि आर्थिक मॉडेलिंगसाठी सल्लागार सेवा नियुक्ती करण्यासाठी सिडकोने वृत्तपत्रांतून निविदा मागविल्या आहेत.

वुई मेक सिटीजचा दावा करणाऱ्या सिडकोने याआधीच नवी मुंबई परिसरात दुसऱ्या मुंबईची निर्मिती केली आहे. यासाठी सिडकोने येथील शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादन केल्या. सिडकोने शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादन करताना वारेमाप आश्वासने दिली, मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात सिडको अपयशी ठरली आहे.

कवडीमोल भावाने संपादन केलेल्या जमिनी बड्या भांडवलदारांच्या घशात घालीत कोट्यवधींचा नफा कमावला आहे. सिडकोची वक्रदृष्टी आता वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा असलेल्या एलिफंटा बेटाकडे वळल्याने अशीच स्थिती स्थानिक रहिवाशांवर येण्याची साधारण भीती ग्रामस्थ, व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपनीला प्राधान्य
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या सल्लागार सेवा देणाऱ्या अनुभवी कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पर्यटन, पर्यटकांसाठी विकास मॉडेल व आर्थिक मॉडेलिंगसाठी सल्लागार सेवा नियुक्ती करण्यात येणार आहे. सल्लागार एजन्सीच्या सल्ल्यानुसारच एलिफंटा व न्हावा बेटावर विकास कामांची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती सिडकोचे प्लॅनिंग विभागाचे अधिकारी प्रियदर्शन वाघमारे यांनी दिली. दरम्यान सिडकोकडून नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची मोठी पिळवणूक झाली आहे. साडेबारा टक्के योजनेतील भूखंडांचे वाटप करताना सिडकोने स्थानिक भुमिपुत्रांची मोठी पिळवणूक केली. भुखंड शेतकऱ्यांऐवजी बिल्डरांच्या घशात कसे जातील यासाठी जिवाचा मोठा अटापिटा केला. त्यामुळे एलिफंटा बेटावरील स्थानिक रहिवाशांनी सिडको नको रे बाबा अशी भूमिका घेतली आहे.