कळवा रेल्वे स्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी; समाजकंटकाला अटक

कळवा रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या समाजकंटकाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी डोंबिवलीतून बेड्या ठोकल्या आहेत. रुपेश रणपिसे (४३) असे धमकी देणाऱ्या माथेफिरूचे नाव असून त्याने दारूच्या नशेत फोन करून धमकी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

दारुड्या रणपिसे याने रविवारी दुपारी स्वतःच्या मोबाईल फोनवरून नागपूर हेडऑफिसच्या ११२ या डायल क्रमांकावर कॉल केला. या वेळी त्याने कळवा रेल्वे स्थानकात बॉम्ब लावला असून तो अॅक्टिव्ह करण्याची धमकी दिली. याबाबत माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाने कळवा स्थानकात धाव घेतली.