
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापांसून मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. त्यांच्यासोबत हजारो मराठी बांधव मुंबईत आले असून त्यांची गैरसोय होत असल्याचेही समोर आले आहे. तसेच जरांगे-पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्नही सुरू नसल्याचे दिसत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी मंगळवारी सकाळी एक्सवर एक पोस्ट शेअर करत सरकारवर खरपूस शब्दांमध्ये टीका केली. मराठा आंदोलनाचा आज पाचवा दिवस असूनही आंदोलकांशी संवाद साधण्यास चर्चा करण्यास सरकारकडून एकही प्रतिनिधी येत नसेल किंवा तोडगा काढण्याचा प्रयत्न होत नसेल तर सरकारची ही भूमिका योग्य आहे का? गेल्या वेळेस निवडणुका होत्या तर १०-१० मंत्री यायचे आणि आता मात्र आंदोलकांना वाऱ्यावर सोडताय? असा सवाल रोहित पवार यांनी केला.
एकीकडे आंदोलकांशी चर्चा करायची नाही आणि दुसरीकडे मात्र जाणूनबुजून आंदोलन बदनाम करून आंदोलनाची सहानुभूती कमी करण्यासाठी कटकारस्थाने रचायची, नेरेटिव्ह सेट करायचा हे सरकारमधील काही नेत्यांना शोभतं का? असा सवालही त्यांनी केला. यावेळी त्यांनी आंदोलकांनाही चुकूनही चूक करू नका, अशी विनंतीही केली.

चुकुनही चूक करू नका. कारण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार केवळ संधी शोधत आहे. सर्वांनी शांतता ठेवत नियम पाळायलाच हवेत. सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता चर्चा करत तत्काळ तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली.
मुख्यमंत्री गणपती दर्शनात व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री गावाला जाऊन बसलेत तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा पत्ताच नाही. एवढा संवेदनशील प्रश्न असताना हे सरकार अजूनही झोपेचं सोंग का घेत आहे? असा सवाल रोहित पवार यांनी केला.




























































