मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेंना आझाद मैदान लवकरात लवकर रिकामे करण्याची नोटीस

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मंगळवार दुपारपर्यंत मुंबईतील सगळे रस्ते, पदपथ, रेल्वे आणि बस स्थानक रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस बजावण्यासाठी पोलीस आझाद मैदानात पोहचले आहेत. तर ‘मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही’ अशी ठाम भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे.

मुंबई पोलिसांनी आम्हाला दिलेल्या मोटिसला आमचे वकील उत्तर देतील असं मराठा आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील आझाद मैदान सोडणार नाहीत .आम्हाला आंदोलन करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, अशी भूमिकाही आंदोलकांनी घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासह आरक्षण समर्थकांना आंदोलनाचा अधिकार असला तरी मुंबई ठप्प करण्याचा, गैरसोय करण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला खारघर मध्ये परवानगी देण्याची स्पष्ट सूचना न्यायालयाने केलेली असताना सरकारने त्याची अंमलबजावणी का केली नाही असे विचारत न्यायालयाने सरकारलाही फटकारले होते.

न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे मराठा बांधव ठिकठिकाणी पालन करत आहेत. सगळे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. मनोज जरांगे यांनी सांगितल्यानंतर सगळी वाहन आणि मराठा बांधव हे मुंबईच्या बाहेर जाऊन थांबले आहेत, असे आंदोलकांनी म्हटले आहे. जरांगे म्हणाले, माझा नाईलाज आहे, मी मरेपर्यंत इथून हटणार नाही. मी मराठ्यांना काल देखील सांगितलं आहे, आजही सांगतो, गाड्या पार्किंगला लावा. मैदानात लावा, रेल्वेने प्रवास करा, बसने प्रवास करा. कुठे पार्किंगला जागा नसेल तर वाशीला नेऊन गाड्या लावा. दिलेल्या मैदानामध्ये गाड्या लावून मग या. तुम्ही शांत राहायचं. माझी तब्येत कितीही खराब झाली तरी देखील तुम्ही शांत राहायचं. वेड्यासारखं करायचं नाही. कितीही त्रास झाला तरी शांत राहायचं. ही लढाई आपण शांततेत लढायची. पण मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही, मी हे देवेंद्र फडणवीसांना ठासून सांगतोय, मी मरेपर्यंत मुंबई सोडणार नाही. न्यायालयाच्या सर्व निर्णयाचं आपण पालन करायचं आहे. न्यायदेवता आपल्याला न्याय देईल, असा विश्वासही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.