
अफगानिस्तानच्या नंगरहर प्रांतातील जलालाबादजवळील भागात रविवारी रात्री ११:४७ वाजता ६.० तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाने जवळपास २ लाख लोकसंख्येच्या भागाला येथे धक्का बसला असून, कुणार प्रांतात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. सोमवारी कुणारमध्ये आणखी ४.६ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याने परिस्थिती आणखी बिकट केली आहे.
तालिबान सरकारने जगभरातील देशांकडून मदत मागितली असून, हिंदुस्थान, चीन आणि ब्रिटनसह संयुक्त राष्ट्रांनी मदतीची घोषणा केली आहे. भूंकपातील मृतांची संख्या १४११ पर्यंत पोहोचली असून, जखमींची संख्या ३२५० च्या पुढे गेली आहे. मृतांची संख्या आणखी वाढू शकते, असे बोलले जात आहे.
भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू जलालाबादपासून १७ मैल अंतरावर नंगरहर प्रांतात आहे. हा डोंगराळ भाग असल्याने आणि भूकंपासाठी रेड झोन म्हणून ओळखला जाणारा भाग असल्याने मदत पोहोचवणे अत्यंत कठीण आहे. भूकंपाच्या धक्क्यांचा परिणाम पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि पंजाब प्रांतांपर्यंत जाणवला, तर हिंदुस्थानातील गुरुग्राममध्येही भूकंपाचे हलके धक्के जाणवले.