
नाशिकच्या नोट छापखाना येथे ज्युनिअर टेक्निशियन परीक्षेत डमी उमेदवार बसवून परीक्षा पास केल्याचा प्रकार चार वर्षांनी समोर आला आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
नाशिक येथे नोट छापखाना आहे. चार वर्षांपूर्वी देवास येथे ज्युनिअर टेक्निशियनसह विविध 135 पदांसाठी भरती घेण्यात आली होती. त्या पदासाठी पवईच्या एका आयटी पार्कमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नावे संकेतस्थळावर झळकली. एकाला संबंधित यंत्रणेने कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले होते. कागदपत्राची छाननी झाल्यावर एकाला ज्युनिअर टेक्निशियन म्हणून निवडले गेले. नोकरीस रुजू होण्यापूर्वी त्याला अहवाल सादर करण्यास सांगितले. अहवाल सादर केल्यानंतर 2011 मध्ये त्याने पदाचा कारभार स्वीकारला. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आले. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची माहिती काढण्यास सुरुवात केली. एका उमेदवाराचा अर्जावरचा फोटो आणि परीक्षेदरम्यान सॉफ्टवेअरद्वारे घेतलेला फोटो हा वेगळा असल्याचे आढळून आले. अधिक तपासात त्या उमेदवाराने 15 हजार रुपये देऊन डमी उमेदवार परीक्षेला बसवल्याचे उघड झाले. घडल्या प्रकरणी पवई पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
——————————–
मालकिणीचा 13 लाख 60 हजारांचा ऐवज लांबवला
एका उच्चभ्रू कुटुंबाकडे घरकामाला लागल्यानंतर घरातील श्रीमंती बघून मोलकरणीची नियत फिरली. तिने हळूहळू करून संधी मिळेल तसे मालकिणीचा किमती ऐवज लांबविण्यास सुरुवात केली. तिने जवळपास 13 लाख 60 हजार किमतीचा ऐवज चोरला. हा प्रकार समोर येताच पोलिसांत तक्रार देण्यात आली. कफ परेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरी करणाऱया मोलकरणीला लगेच अटक केली.
कफ परेड येथील मेकर टॉवरमध्ये राहणारे बन्सल यांच्याकडे तीन महिन्यांपूर्वी सुशिला बगदी (41) ही घरकामाला लागली होती. सुशिला सकाळी 7 ते दुपारी दीड इतक्या वेळेपुरतीच कामाला जात होती. मात्र काम करत असताना तिची बन्सल यांच्या किमती ऐवज आणि कपाटातील रोख रकमेवर नजर पडली होती. तिने संधी साधत मिळेल तसे बन्सल यांचे परफ्यूम, मोबाईल चार्जर, महागडी लिपस्टिक आदी साहित्य तसेच बेडरुमच्या कपाटात ठेवलेली रोकड असा 13 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. बन्सल यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी सुशिलाला हटकले. पण तरीही तिची हातसफाई सुरूच होती. अखेर चोरी करून ती पसार झाल्यानंतर बन्सल यांनी कफ परेड पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कफ परेड पोलिसांनी तत्काळ तपास करून सुशिला बगदी हिला अटक केली.
——————————–
हद्दपार असतानाही घाटकोपरमध्ये फिरत होता
हद्दपार केले असतानाही कुठलीही परवानगी न घेता घाटकोपरमध्ये येऊन बिनधास्त रस्त्यावरून फिरणाऱया एका तरुणाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. मो. ताहीर तारिक खान (31) असे त्याचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त परिमंडळ 7 यांच्या आदेशाने मो. ताहीर खान याला एक वर्षासाठी मुंबई, उपनगरे, ठाणे व नवी मुंबईतून हद्दपार करण्यात आले होते. असे असतानाही ताहीर पोलिसांना कुठलीही सूचना न देता घाटकोपर परिसरात आला होता. तो रस्त्याने पायी जात असताना पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांना बघून तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी लगेच त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याने उपायुक्तांच्या हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी त्याला पकडले आहे.





























































