
दक्षिण मुंबईतील रेडिओ क्लबजवळील समुद्रातून जलवाहतुकीसाठी जेटी बांधण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने आता खुला केला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतून रो-रो फेरी बोट सेवेतून थेट अलिबाग, दिघी व काशिदपर्यंत जाण्याचा प्रवासी मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी प्रवाशांचा वेळ, इंधनात बचत आणि वाहतूककोंडी कमी होणार असून रायगड जिह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
जेटीविरोधात स्थानिकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या जेटीच्या विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे रेडिओ क्लबजवळील जेटीवरून जलवाहतूक नजीकच्या काळात सुरू होणार आहे.
गेट वे ऑफ इंडियावरून समुद्रमार्गे अलिबागला जाणाऱया पर्यटकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांपासून वाढ झाली होती. त्यामुळे गेट वे ऑफ इंडिया येथील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब येथे नवीन प्रवासी जेटी बांधण्याची योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने आखली आहे.
मुंबईतून थेट दिघी गाठता येणार
सध्या मुंबईतून अलिबागला जाण्यासाठी रो-रो सेवा सुरू झाली आहे. त्याच धर्तीवर रेडिओ क्लबवरून काशिद व दिघीपर्यंत ही जलवाहतूक सुरू होईल. या प्रकल्पामुळे मुंबईतील प्रवाशांना मुरुड, जंजिरा, दिवे आगार, श्रीवर्धन समुद्रमार्गे गाठता येईल.
राज्य व केंद्र सरकारचा निधी
महाराष्ट्राला 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचा फायदा घेत केंद्र सरकारने सागरमाला ही योजना आखली आहे. या योजनेत केंद्र सरकारचा पन्नास टक्के आणि राज्य सरकारचा पन्नास टक्के निधी असेल. या योजनेमुळे राज्याच्या किनारपट्टीवरील जेटी व बंदरे विकसित होतील.
दरवर्षी प्रवासी संख्येत दहा टक्के वाढ
मेरीटाइम बोर्डाच्या माहितीनुसार दरवर्षी गेट वे ऑफ इंडियाच्या जेटीवरून सरासरी 26 लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या संख्येत दरवर्षी दहा टक्के प्रवाशांची भर पडते. गेट वे ऑफ इंडिया येथे जलवाहतुकीसाठी सध्या दोनच धक्के आहेत. त्यामुळे या जेटीवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी रेडीओ क्लब येथे नवीन जेटी बांधण्याची योजना आखली आहे.

























































