धारावीच्या श्री हनुमान सेवा मंडळाची बाजी, सुभाष डामरे मित्रमंडळाची गणेश दर्शन स्पर्धा

परळ येथील सुभाष डामरे मित्रमंडळ यांनी दरवर्षीप्रमाणे शिवराज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने प्रदीप भोसले यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या मुंबई जिल्हास्तरीय पातळीवर (कुलाबा ते दहिसर-मुलुंड) सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धा व गणराज चषक स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत धारावी काळाकिल्ला येथील श्री हनुमान सेवा मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. परळचा विघ्नहर्ता अर्थात परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दुसरा, तर विलेपार्ले पूर्व येथील न्यू एअरपोर्ट कॉलनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तिसरा क्रमांक पटकावला.

मंडळाचे संस्थापक आनंद गांवकर व मंडळाचे संचालक – शिवसेना सचिव सुधीर साळवी, आमदार महेश सावंत, शिवसेना उपनेते संजय सावंत, माजी नगरसेविका उ र्मिला पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उत्तेजनार्थ नामांकन बेस्ट नगर सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ (गोरेगाव पश्चिम), सहारेश्वर शिवसेवा मंडळ (अंधेरी पूर्व), वर्दीचा राजा अर्थात ताडदेव सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ (ताडदेव), पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (डिलाईल रोड), ताराबाग सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ (ताराबाग) यांना देण्यात आले, तर उत्कृष्ट मूर्ती म्हणून विलेपार्ले पूर्व येथील मुंबईचा पेशवा अर्थात बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि विक्रोळीचा राजा अर्थात कन्नमवार नगर क्र. 1 उत्सव समिती यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. अवधूत भिसे, रूपेश कोचरेकर, अभिषेक गवाणकर यांनी केले.