
टेक ऑफच्या तयारीत असतानाच विमानाला पक्षी धडकल्याने एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान गुरुवारी रद्द करण्यात आले. विमानात 90 प्रवासी होते. नियोजित विमानाचे उड्डाण रद्द केल्यानंतर प्रवाशांना पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली.
एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान गुरुवारी नियोजित वेळेत विजयवाडा विमानतळावरून बंगळुरूसाठी उड्डाण घेणार होते. मात्र उड्डाणाच्या तयारीत असतानाच विमानाच्या पुढील भागाला पक्षाने धडक दिली. यामुळे विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले. प्रवाशांना बंगळुरूला जाण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली.
एअर इंडिया एक्सप्रेसने एक निवेदन जारी करत प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. एअरलाईन्सकडून सर्व प्रवाशांना मोफत दुसऱ्या विमानाची तिकिट बुक करणे किंवा तिकिट रद्द करायचे असल्यास पूर्ण रिफंडचे पर्याय देण्यात आले.