
मुलांची बनावट कागदपत्रे देऊन शासनाकडून असलेल्या शासकीय योजनेचा लाभ घेऊन शासनाची 45 हजार तिनशे रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरमी चार जणांविरुद्ध सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या तक्रारीवरून शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारी यास्मिन शेख यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शासकीय योजनांतून कामगारांच्या पाल्यांना लाभ देण्यात येतो. सन 2024-25 वर्षामधील कामगारांनी त्यांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्तीकरिता दाखल केलेल्या अर्जाची पडताळणी केली असता यात 4 जणांची बोनाफाईट प्रमाणपत्र ही खोटी व बनावट असल्याचे आढळून आलेली आहेत.
आरोपी प्रभु नारायण उरडवार याने वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक बोनाफाईट प्रमाणपत्र तसेच ग्रामसेवकाचे स्वतःचे 90 दिवसाचे प्रमाणपत्र लावून पेटी अत्यावश्यक संच व सुरक्षा किट किंमत 9,240 रुपये लाभ घेतला. राधाबाई किशनराव घुसे आणि पुष्पा विजय झुझारे यांनी सुद्धा त्यांच्या पाल्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक बोनाफाईट बनावट प्रमाणपत्र व महानगरपालिकेचे स्वत:चे 90 दिवसाचे प्रमाणपत्र लावून पेटी अत्यावश्यक संच व 9,240 रुपये किंमतीची सुरक्षा किट याचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली आहे. चौथी आरोपी गंगाबाई दिगंबर कासरे यांनी त्यांच्या पाल्यासाठी वैद्याकिय महाविद्यालयाचे शैक्षणिक बोनाफाईड बनावट प्रमाणपत्र तसेच ग्रामसेवकाचे स्वतःचे 90 दिवसाचे प्रमाणपत्र लावून 17 हजार 647 पेटी अत्यावश्यक संच व सुरक्षा किटचा लाभ घेत शासनाची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे या चारही जणांवर शासनाची 45 हजार तिनशे रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विविध कलमान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थडवे हे करीत आहेत.