60 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपावर शिल्पा शेट्टीच्या पतीने सोडले मौन

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा सतत चर्चेत आहेत. या दोघांवर एका व्यावसायिकाने 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. दरम्यान झालेल्या आरोपावर या दोघांकडूनही  कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. आता मात्र या प्रकरणावर राज कुंद्राने भाष्य केले आहे.

राज कुंद्रा सध्या त्यांच्या मेहर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान राज यांना कथीत 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाबद्दल विचारण्यात आले. यावेळी त्यांनी प्रथमच यावर आपली प्रतिक्रिया दिली. लवकरच सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असे त्यांनी सांगितले.

इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत राज कुंद्राने सांगितले की, तो आणि शिल्पा निर्दोष आहेत आणि सत्य लवकरच बाहेर येईल. थोडी वाट पाहूया, कारण हे जीवन आहे. आणि आम्ही या प्रकरणाबद्दल काहीही बोललो नाही कारण आम्हाला माहित आहे की, आम्ही काहीही चुकीचे केले नाही. शेवटी सत्य बाहेर येईल. आम्ही आयुष्यात काहीही चुकीचे केले नाही आणि ते कधीही करणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) राज कुंद्रा यांच्याविरुद्ध समन्स जारी केले होते. यानुसार राज यांना 10 सप्टेंबर रोजी EOW समोर हजर राहण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी त्यांच्या वकिलाशी बोलून यासाठी वेळ मागितला. आता राज यांना 15 सप्टेंबर रोजी EOW समोर हजर राहावे लागणार आहे. तसेच राज आणि शिल्पाविरुद्ध लूकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे. ज्यामुळे ते देशाबाहेर जाऊ शकत नाहीत.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, 60 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल