महिनाअखेरीस नवी मुंबईतून पहिले टेकऑफ

अर्धा डझन डेडलाईनला हुलकावणी दिल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. या महिनाअखेरीस नवी मुंबईतून पहिल्या विमानाचे टेकऑफ होणार असून प्रत्यक्षात प्रवाशी आणि कार्गो सेवा सुरू होण्यासाठी नोव्हेंबर उजाडणार आहे. विमानतळाचे उद्घाटन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नवी मुंबईतून हवाई प्रवासाच्या स्वप्नाचे आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून हवाई प्राधिकरणाने केलेल्या सर्वच चाचण्यांमध्ये हे विमानतळ पास झाले आहे. या विमानतळाला कमळाच्या पाकळ्यांचा आकार देण्यात आला आहे. विमानतळाची रचना ‘क्वीन ऑफ द कर्व्ह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध आर्किटेक्ट झाहा हादीद यांनी केली आहे. विमानतळाची घोषणा झाल्यानंतर विमानतळाच्या वाटेत अनेक विघ्ने उभी राहिली होती. स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा न्याय्य हक्कांसाठी संघर्ष, त्यानंतर विमानतळाला आकार देणाऱ्या कंपनीची आर्थिक अडचण यामुळे विमानतळाची मोठी रखडपट्टी झाली. पुढे या विमानतळाची जबाबदारी अदानी समूहाकडे आली. त्यानंतर विमानतळाचे काम वेगाने सुरू झाले. आता पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या महिनाअखेरीस विमानतळाचे उद्घाटन होणार आहे.

देशातील सर्वात मोठे विमानतळ

देशात सर्वात मोठे विमानतळ म्हणून ओळखल्या जाणाऱया नवी मुंबई विमानतळाची तुलना लंडनमधील हिथ्रो विमानतळाशी होणार आहे. या विमानतळाचे उद्घाटन येत्या 30 सप्टेंबरपर्यंत होणार आहे. प्रत्यक्षात प्रवाशी आणि मालवाहतूक सेवा येत्या नोव्हेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या विमानतळाला वॉटर जेट्टीने जोडले जाणार आहे. त्यामुळे विमानतळावरून प्रवाशांना गेट वे ऑफ इंडिया आणि अन्य ठिकाणी सहज प्रवास करता येणार आहे, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ‘बिल्डिंग फॉर टुमारोज एमएमआर’ या विषयावर सुरू असलेल्या चर्चासत्रात दिली.

प्रवाशी क्षमता दोन कोटी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात विमानतळाची क्षमता वर्षाला दोन कोटी प्रवाशी हाताळण्याची आहे. विमानतळाचे सर्वच टप्पे आणि चारही टर्मिनल सुरू झाल्यानंतर प्रवाशी हाताळण्याची वार्षिक क्षमता नऊ कोटींवर जाणार आहे. हे विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई विमानतळावरील ताण कमी होणार आहे.