
कांडला ते मुंबई विमान प्रवास करणाऱ्या जवळपास 75 प्रवाशांनी शुक्रवारी हवेत ‘जीवघेणा’ थरार अनुभवला. स्पाईसजेटच्या विमानाने गुजरातच्या कांडला येथून टेक ऑफ घेताच विमानाचे चाक धावपट्टीवर निखळले. तशा अवस्थेत विमानाने मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु ठेवला. सायंकाळी चारच्या सुमारास विमानाने मुंबई विमानतळावर सुरक्षित लॅण्डिंग केले आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
‘स्पाइसजेट क्यू 400’ विमानाने कांडला येथून उड्डाण घेतले होते. टेक ऑफवेळी विशिष्ट वस्तू धावपट्टीवर पडल्याचे एटीसीला दिसले. त्याबाबत एटीसीने वैमानिकाला अलर्ट केले आणि धावपट्टीवर खातरजमा केली असता तेथे निखळलेले चाक आढळले. त्यानंतर मुंबई विमानतळाला सतर्क करुन सुरक्षित लॅण्डिंग करण्यात आले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याचे विमानतळ अधिकाऱयांनी सांगितले.