महाराष्ट्रातील मतचोरी सर्वांसमोर आणणार, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मैदानात

मतदार यादीतील  गोंधळ व मतचोरीच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने राज्यव्यापी लढा पुकारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते बूथ स्तरावर यादीची तपासणी करण्यासाठी आता मैदानात उतरणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिली.

टिळक भवनमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मतदार यादीतील गोंधळ व मतचोरीच्या विरोधात लढा उभारण्याचा ठाम निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. पुढील एक महिना महाराष्ट्र युवक काँग्रेस बूथनिहाय मतदार यादीवर काम करतील आणि  आवश्यक माहिती गोळा करून पुढील रणनीती आखणार असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले.

या बैठकीत युवक काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी अजय छिकारा, प्रदेश युवक काँग्रेसचे नवनियुक अध्यक्ष शिवराज मोरे, सहप्रभारी नवज्योत सिंग संधू,  शाम्भवी शुक्ला यांनी पदाधिकाऱयांना मार्गदर्शन केले. मागील काळातील कामगिरीचा आढावा घेत, आगामी काळातील युवक काँग्रेसच्या कामकाजाची रूपरेषा या बैठकीत निश्चित करण्यात आली.