
आरक्षणाच्या मागणीसाठी आणि गावात कुणबी नोंदी न मिळाल्याने निराश झालेल्या २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १२ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. अभिजित गोविंद सोळंके (२७, रा. खंडाळी, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
अभिजित हा मराठा आरक्षणासाठीच्या विविध आंदोलनांमध्ये सक्रिय होता. त्याला गावामध्ये कुणबी समाजाची कोणतीही नोंद सापडली नाही, त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून खूप चिंतेत होते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातही तो सहभागी झाला होता. शासनाकडून सातत्याने होणारी फसवणूक आणि आरक्षणाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे तो निराश झाला होता.
अहमदपूर शहरात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या अभिजीतने १२ सप्टेंबर रोजी दुपारी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येमुळे मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याच्या चुलत्यांनी, राहुल मारोती सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाची मागणी आणि गावामध्ये कुणबी नोंदी न सापडल्याने अभिजितने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेची नोंद अहमदपूर पोलीस ठाण्यात करण्यास आली आहे असून, या दुर्दैवी घटनेनंतर मराठा समाजामध्ये शोककळा पसरली असून, सरकारने या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.