भाईंदरमध्ये डंपरने मुलाला चिरडले; संतप्त नागरिकांचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन, आक्रमक पवित्र्यानंतर आरएमसी प्लाण्ट बंद

काशिमीरा येथील नीलकमल नाक्याजवळ गुरुवारी सिमेंट काँक्रीटची वाहतूक करणाऱ्या डंपरने सनी राठोड या बारा वर्षांच्या मुलाला चिरडले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आज ठिय्या आंदोलन करत निषेध केला. तसेच आरएमसी प्लाण्टला परवानगी देणाऱ्या प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर काशिमीरा परिसरातील पाच आरएमसी प्लाण्ट बंद करण्यात आले आहेत. तसे पत्रच महापालिकेने मालकांना दिले असून हयगय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.

सनी राठोड हा गुरुवारी रस्त्याने जात असताना मागून आरएमसी प्लाण्टमधून आलेल्या डंपरने त्याला जोरदार धडक दिली. डंपरचे चाक त्याच्या पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. राठोड याला तातडीने स्थानिक नागरिकांनी आशिष रुग्णालयात दाखल केले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर डंपरचालक प्रमोद यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात संताप व्यक्त होत आहे.

पालिका अधिकाऱ्यांचे आदेश

आज काशिमीरा परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन आरएमसी प्लाण्ट तत्काळ बंद करा, अशी मागणी करीत आंदोलन छेडले. माशाचा पाडा येथे मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटचे प्लाण्ट सुरू असून यापूर्वीदेखील अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे हे प्लाण्ट बंद करा, अशी मागणी करण्यात आली. ती मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा दिला. अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र चव्हाण यांनी तातडीने पाच आरएमसी प्लाण्ट बंद करण्याचे आदेश दिले.