पलावा पुलावरील खड्डे मास्टिकने बुजवले, शिवसेनेच्या इशाऱ्याने प्रशासनाची पळापळ

कल्याण-शिळफाटा मार्गावरील काटई निळजे (पलावा) रेल्वे उड्डाणपुलाची उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांतच वाट लागली आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन पुलावरील खड्डे तातडीने बुजवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिला होता. शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर एमएसआरडीसी प्रशासनाची पळापळ झाली आणि निळजे पुलावरील जीवघेणे खड्डे मास्टिकने बुजवले.

निळजे पुलावर खड्डे पडल्याने बदलापूर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी येथील नोकरदारांसह इतर वाहनचालकांना दररोज वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरून अधिक धोकादायक होत असून वाहतुकीची गती मंदावते. खड्ड्यांमुळे वाहनांची आदळआपट होऊन पाठ, मणक्याच्या दुखण्यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. पुलाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत शिवसेना उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर पुलावरील खड्डे भरण्यात आले. एमएसआरडीसी प्रशासनाने तत्काळ दखल घेत पुलावरील खड्डे बुजवल्याबद्दल राहुल भगत यांनी समाधान व्यक्त केले.

युद्धपातळीवर काम

एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांतच मध्यरात्रीच्या वेळेत युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे काम केले. प्रथम खडी आणि डांबरमिश्रित मिश्रणाने खड्डे भरले गेले आणि त्यावर मास्टिक अस्फाल्ट मिश्रणाचा थर दिला. हे काम बुधवार मध्यरात्री सुरू होऊन गुरुवार मध्यरात्री पूर्ण करण्यात आले.