राहुरीच्या धर्माडी गेस्ट हाऊससमोर झालेल्या अपघातात एकजण ठार, तर राहुरी खुर्द हद्दीत झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
गेल्या दहा दिवसांत लागोपाठ झालेल्या अपघाताच्या घटनांत आठ लोकांचा बळी गेल्याने शुक्रवारी (दि. 12) सकाळी मयतांचे नातेवाईक तसेच संतप्त नागरिकांनी अहिल्यानगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरीच्या मुळा नदीपुलाजवळ तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे या मार्गावर दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. श्रीरामपूर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने मान्य केले असून, पंधरा दिवसांसाठी या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
अपघाताची पहिली घटना शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. राहुरीतील शशिकांत दुधाडे (वय 65) हे सकाळी 7 वाजता राहुरी कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले या शाळेत नातवाला सोडण्यासाठी गेले होते. नातवाला शाळेत सोडून माघारी येत असताना धर्माडी गेस्ट हाऊससमोरील रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुधाडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. दरम्यान, हा अपघात पाहण्यासाठी राहुरी खुर्द येथील कृष्णा सोमनाथ गोल्हार (वय २२) हा तरुण दुचाकीवरून घटनास्थळी जात असताना शनिशिंगणापूर फाटा परिसरात त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.
अपघाताच्या पहिल्या घटनेतील मयत शशिकांत दुधाडे यांचा शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अहिल्यानगर-मनमाड राज्य महामार्गाची दुरवस्था झाल्याने लहान-मोठ्या अपघाताच्या घटनांत दिवसेंदिवस वाढत होत आहे. या मार्गावर राहुरी हद्दीत गेल्या दहा दिवसांत आठ लोकांचा बळी गेल्याने शुक्रवारी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील अधिकारी तसेच या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
अहिल्यानगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी हद्दीत तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन होण्याची ही पहिली घटना असून, या आंदोलनात अडकलेल्या वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.