
>>शीतल धनवडे
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असताना ठेकेदारधार्जिणा शक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे. यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी साम, दाम, दंड भेदाने घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापुरातील महायुतीचे सर्वच आमदार यासाठी ज्यापद्धतीने आघाडीवर आहेत, त्याच तडफेने जिल्ह्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यात मात्र अपयशी ठरल्याचे दिसत आहे. त्यापैकीच पंचगंगा नदीवर कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावरील समांतर अर्धवट राहिलेला पूल याचे एक ढळढळीत उदाहरण म्हणावे लागेल.
यंदाच्या पावसाळ्यात तब्बल तीन महिने पाण्याखाली गेल्याने हा मार्ग बंद राहिला. पण एक-दोन शेतकऱ्यांमुळे आजपर्यंत अर्धवट असलेला हा पूल पूर्ण करून त्याचे श्रेय घेण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसत नाही. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गासाठी अट्टाहास करणाऱ्या जिल्ह्यातील महायुतीचे मंत्री आणि आमदारांकडून राजाराम बंधारा समांतर पुलाचा मात्र उपहास होत असल्याचे चित्र आहे.
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील वडणगे, शिये, भुयेवाडी, निगवे आदी वीस गावांतील दळणवळणासाठी पंचगंगा नदीवर कसबा बावडा येथे कोल्हापुरी पद्धतीचा राजाराम बंधारा आहे. या बंधारा मार्गावरून दररोज येथून मोठी वर्दळ असते. पण पावसाळ्यात हा बंधारा पाण्याखाली जात असल्याने या गावांचा दळणवळणाचा मार्ग बंद होतो.
पावसाळ्यातही दळणवळण सुरू राहावे, यासाठी या बंधाऱ्याला लागूनच शेजारी समांतर पूल बांधण्यात आला आहे. सन 2017 मध्ये 7.5 मीटर रुंद आणि 192 मीटर लांब अशा या पुलासाठी नाबार्डकडून 17 कोटींचा निधी मिळाल्याचे सांगितले जाते. पण पाच वर्षांत बांधकाम विभागाचे तीन कार्यकारी अभियंता बदलून गेले तरीही या समांतर पुलाचे काम अर्धवटच आहे. जोडरस्त्याच्या भूसंपादनाचे त्रांगडे सुटत नसल्याने काम करण्यास असमर्थ असल्याचे पत्र संबंधित ठेकेदाराने बांधकाम विभागाला दिले आहे. यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नदीच्या मधोमध समांतर पूल अर्धवट अवस्थेत आहे. याबाबत नागरिकांमधून वारंवार विचारणा केली जात असूनही लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तरे दिली जात नाहीत. शिवाय रखडलेल्या कामाबाबत हालचालही दिसत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यअध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजाराम बंधाऱ्याला समांतर पुलाचे काम एप्रिल महिन्यात पुन्हा सुरू करण्यात येईल. उर्वरित कामासाठी लागणारा १० कोटींचा निधी मार्च महिन्यात मिळेल, त्यामुळे पूल बांधण्यात अडथळा येणार नसल्याची ग्वाही दिली होती. तसेच पुलाचे काम सुरू असताना भरपाईसाठी शेतकरी न्यायालयात गेल्याने हे काम ठप्प झाले आहे. याबाबत एकाच शेतकऱ्याची तक्रार आहे. त्यामुळे बांधकाम विभाग या जमिनीचा सक्तीने ताबा घेऊन संबंधितांच्या बँक खात्यावर पैसे वर्ग करून पुलाचे काम एप्रिलपासून सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. पण पाच महिने झाले तरी या समांतर पुलाबाबत उदासीनता दिसून येत आहे. या कामाला अद्यापि सुरुवात झाली नाही. यंदा पावसाळ्यात पाचवेळा राजाराम बंधारा 16 जून ते 6 ऑगस्टपर्यंत वीस दिवस पाण्याखाली गेला होता. त्यानंतर 15 ऑगस्टला पाण्याखाली गेल्यानंतर तो 8 सप्टेंबरला खुला झाला. तब्बल तीन महिन्यांनी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
सध्या शक्तिपीठ महामार्गासाठी महायुतीचे सर्वच आमदार प्रयत्नशील आहेत. विशेषतः राजेश क्षीरसागर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. मात्र, कामाची ग्वाही देऊनही त्यांच्याकडून समांतर पुलाकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वर्षानुवर्षे रखडलेला हा समांतर पूल पूर्ण करण्याची तत्परता पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचा एकही नेता, आमदार, खासदारांकडून पूर्ण होताना दिसून येत नाही.





























































