वंदे मातरम्

स्वामी रामानंद तीर्थ यांचे आत्मकथन 1976 मध्ये मराठीत प्रकाशित झाले होते. मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद वि.पां. देऊळगावकर यांनी केलेला आहे. मागील अनेक वर्षे ते पुस्तक उपलब्ध नव्हते, ज्याची नवी आवृत्ती ‘संन्याशाच्या डायरीतून ः हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी’ या नावाने साधना प्रकाशनाकडून प्रकाशित होत आहे. 50 वर्षानंतर येणाऱ्या या नव्या आवृत्तीचे प्रकाशन हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. त्यानिमित्त पुस्तकातील एका प्रकरणाचा हा अंश.

हैद्राबाद संस्थानातील विद्यार्थी जगतात सर्वात आधी चळवळीचा वणवा पेटला. वाढत असलेल्या देशभक्तीच्या उत्कटतेने त्यांची मने भारावून गेलेली होती. साऱया देशात स्वातंत्र्यासाठी उठाव होत असताना तरुण मंडळींनी कृत्रिम अशा वातावरणात न राहता चळवळीत पडणे साहजिकच होते. हैद्राबाद संस्थानातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर ते अधिक यथार्थ होते. अलीकडे काही दिवसांपासून मोठय़ा मानभंगाच्या, अपमानास्पद व संतापजनक परिस्थितीत त्यांना जीवन कंठावे लागत होते. विद्यामंदिरे ही कट्टर जातीयवादाचे अड्डे झाल्याचे दृश्य दिसत होते. सर्व मार्ग – विशेषत सरकारी नोकरीचे हे मुस्लिम विद्यार्थ्यांकरिताच राखून ठेवल्यासारखे होते. मुस्लिमेतरांना उज्ज्वल भविष्याची आशा नव्हती. या कारणामुळे एकाच जमातीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना सत्याग्रह चळवळीतील उत्साह जाणवला व त्यायोगे आतापर्यंत त्यांच्या मनावर जे एक दास्याचे दडपण होते ते नाहीसे झाले.

आताच्या छत्रपती संभाजीनगर येथे पहिला बार उडाला. तेथील सरकारी इंटरमीजियट कॉलेजातील विद्यार्थ्यांची मने देशभक्तीने भारावून गेली होती. गोविंदभाई श्रॉफ हे त्या वेळी त्या कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम करीत असत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर देशभक्तीचे बी रुजविले होते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, असे विद्यार्थ्यांना वाटू लागले. त्या वेळी सरकारी शाळातून आसफजाही घराण्याच्या उत्कर्षासाठी एक प्रार्थना म्हणण्याची पद्धत होती. वर्ग सुरू होण्यापूर्वी संस्थानभर सर्व सरकारी शाळांतून हे गीत मुलांकडून सांघिक स्वरूपात म्हणून घेतले जाई. ते गीत म्हणणे म्हणजे आसफजाही घराण्याशी आपण राजनिष्ट राहू, अशी प्रतिज्ञा घेण्यासारखे होते. तरुणांना ते पटेना. त्याविरुद्ध जोरदार बंड करण्याच्या मनस्थितीत जे विद्यार्थी होते, त्यांनी ते आसफजाही गीत गाण्याचे नाकारले. त्याऐवजी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत ते गाऊ इच्छित होते. कारण त्यात स्वातंत्र्य संग्रामाचा प्रतीकात्मक आविष्कार होता. एकेदिवशी काही मुस्लिम विद्यार्थ्यांसह एकजात सर्व विद्यार्थ्यांनी आसफजाही गीत म्हणण्याचे नाकारून ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत म्हटले. हा प्रकार वसतिगृहातून व संस्थानभर निरनिराळ्या शैक्षणिक संस्थांतून झाला.

अधिकाऱ्यांना हे अराजनिष्ठ कृत्य सहन झाले नाही. राज्यकर्त्या घराण्याचा आदर न करणे हा राजद्रोह होता. एकाच संस्थेपुरती मर्यादित अशी ही घटना नव्हती. विद्यार्थी जगताने आव्हान स्वीकारले होते. ‘वंदे मातरम्’ गीत गाणे हा आपला अधिकारच आहे. म्हणूनच ते गाण्याचा आग्रह विद्यार्थ्यांनी धरला. सरकारनेही तितकीच कणखर भूमिका घेतली. गोविंदभाई श्रॉफ यांनी कॉलेजच्या कामाचे त्यागपत्र दिले व ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत गाण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चालविलेल्या चळवळीचे ते सूत्रधार बनले. विद्यापीठाचे आवार त्या गाण्याने निनादून गेले. अधिकाऱयाने ते गीत गाण्यास बंदी घातल्याचे आदेशपत्र काढले. विद्यार्थ्यांनी जर ते गीत म्हणण्याचा हट्ट धरला, तर त्यांना कडक शासन केले जाईल, अशी धमकी दिली गेली, पण विद्यार्थी डगमगले नाहीत. त्यांनी आपल्यापैकीच काही जणांची एक कृती समिती नेमली व संस्थानात व संस्थानाबाहेरसुद्धा आवश्यक ते लोकमत निर्माण केले. त्या वेळी सर अकबर हैदरी हे हैद्राबाद संस्थानचे पंतप्रधान होते. त्यांच्याकडून या चळवळीविरुद्ध कडक उपायांचीच अपेक्षा होती. विद्यार्थ्यांचा निश्चयही तितकाच दृढ होता. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा, कॉलेजांवर बहिष्कार घालावा असे आवाहन करण्यात आले. चळवळीचा जोर कमी करण्याची कृती समितीची इच्छा नव्हती. विद्यार्थी कातळासारखे निश्चल राहिले आणि पुढे उस्मानिया विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी पहिला आदेश मागे घेतला व ‘वंदे मातरम्’ गीत गाण्यास परवानगी दिली.

या चळवळीने हैद्राबाद संस्थानातील स्वातंत्र्य आंदोलनाचा भक्कम पाया रचला गेला. सुशिक्षित युवकांना राष्ट्राची निकड तीव्रतेने जाणवली होती व उदात्त ध्येयासाठी त्यांनी कष्टही खूप सोसले होते. पुढील काळात तर ती ज्योत अधिकच प्रकाशमान झाली. विद्यार्थी संघ स्थापन होऊन सगळे विद्यार्थी संघटित झाले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय वृत्तीच्या शक्तीशी दिलेली साथ म्हणजे हैद्राबादच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासातील एक अत्यंत सुंदर प्रकरण होय. पुढे येणाऱया स्वातंत्र्य संग्रामात त्यांना आणखी मोठी कामगिरी पार पाडावयाची होती. ‘वंदे मातरम्’ चळवळीचा सर्व तरुण पिढीच्या मनावर खूप खोल असा ठसा उमटला.