
>> चैताली कानिटकर
ब्रिटिश गिर्यारोहक फ्रँक स्मिथ आणि त्यांची टीम माऊंट कामेटच्या मोहिमेवरून परतत असताना मार्ग चुकले व हा चुकलेला मार्ग एका स्वप्नवत प्रदेशात खुला झाला. फुलांचं नयनरम्य जग जे पाहताना आपण केवळ मंत्रमुग्ध होतो. रानफुलांच्या या जगाची भ्रमंती करतानाचा हा अनुभव केवळ शब्दातीत आहे.
तुम्हाला ट्रेकिंगची आवड नसेल किंवा तुम्ही ट्रेकर नसाल तरीसुद्धा या जगप्रसिद्ध ट्रेकबद्दल निश्चि्2ात ऐकले असणार. उत्तराखंडमधील साधारण पाच-सहा दिवसांचा हा ट्रेक आहे. साधारण 15200 फूट उंचावर असणारा हा ट्रेक आहे ज्याचे एकूण अंतर 38 किमी इतके आहे. फुलांच्या नयनरम्य जगातील ही भ्रमंतीच जणू… असा हा व्हॅली ऑफ फ्लॉवर ट्रेक.
या ट्रेकचा शोध कसा लागला याची कहाणी रंजक आहे. 1931 मध्ये प्रसिद्ध ब्रिटिश गिर्यारोहक फ्रँक स्मिथ आणि त्यांची टीम माऊंट कामेटच्या मोहिमेवरून परतत असताना त्यांचा मार्ग चुकला. ते पुष्पावती नाल्याने भरलेल्या एका लपलेल्या दरीत भटकले. त्यांना जे सापडले त्यामुळे ते मंत्रमुग्ध झाले – प्रत्येक दिशेने फुललेल्या रानफुलांचा न संपणारा दीर्घ पल्ल्याचा हा मार्ग. स्मिथ हे दृश्य पाहून इतके प्रभावित झाले की, त्यांनी आपल्या पुस्तकात या जादुई जागेला ‘फुलांची दरी’ असे नाव दिले आणि या जादुई जागेला कायमचे नकाशावर ठेवले.
1980 मध्ये या भागाला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क म्हणून घोषित करण्यात आले. नंतर 2002 मध्ये याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. तेव्हापासून हे नाव दूरवर पसरले आहे. आज हा ट्रेक जागतिक स्तरावर ओळखला जातो आणि जगातील सर्व भागातील ट्रेकर्सच्या यादीत त्याचा समावेश आहे.
डेहराडूनमधील जॉली ग्रॅट विमानतळावरून टॅक्सी पकडून या ट्रेकच्या बेस कॅम्पला गोविंदघाटला जाता येते किंवा रेल्वेने यायचे असल्यास हृषिकेश रेल्वे स्थानकावरून टॅक्सी पकडून येथे येता येते. रात्रीच्या मुक्कामानंतर दुसऱया दिवशी कराचीला गाडीने जावे लागते. या प्रवासात पीपलकोटी गाव, द्रोणागिरीची विशाल पर्वतरांग दृष्टीस पडते. त्याच्या पुढील दिवशी घंघारियाला जावे लागते. येथे जातानाही सुरुवातीचा पूलनाचा प्रवास कारने करावा लागतो. पूलना ते घंघारिया हा 9 किमीचा ट्रेक आहे. साधारण पाच ते सहा तास ट्रेकला लागतात. हे अंतर आपल्या फिटनेसची टेस्ट करते व घंघारियाला पोहोचल्यावर गुरुद्वारा, हॉटेल्स, रेस्टॉरंटसुद्धा उपलब्ध आहेत . त्याचा पुढील दिवस समीटचा अर्थातच व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला पोहोचण्याचा! सकाळी लवकर उठून आपण सहा-सात तासांचा ट्रेक करत ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’च्या तिकीट घराजवळच पोहोचतो.
संपूर्ण दरी सहसा निळ्या, लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगांनी, फुलांनी व्यापलेली असते. ती शिखरांनी वेढलेली असते. विविध रंगाची झाडं, मध्यभागी राखाडी आणि तपकिरी माती व वरच्या बाजूला बर्फ हे दृश्य मनात साठवून घेण्यासारखे आहे. जर तुम्ही जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ट्रेकला गेलात तर तुम्हाला डॉग फ्लॉवर, व्हाईट लीफ हॉग फूट, रिव्हर अॅनिमोन, ब्लू पॉपी, हिमालयन रोझ, हुक्ड स्टिक सीड, स्नेक फॉइल आणि मेडो जेरेनियम अशी असंख्य बहुरंगी, बहुढंगी फुले पाहायला मिळतात.
याच ट्रेकमध्ये पुढील दिवस हेमकुंड साहिब हे ठिकाण आहे. नऊ-दहा तास चालल्यानंतर एक सुंदर तलाव नजरेस पडतो. तलावाभोवती अनेक ब्रह्मकमळं व हिमालयीन फुलांचे फोटो काढण्यात आपण दंग होतो. दुपारनंतर पुन्हा उतरून आपण घंघारियाला पोहोचतो. शेवटच्या दिवशी घांगरियाहून गोविंदघाटला परत यावे लागते. हे अंतर 13 किलोमीटर इतके आहे. हे पार करत सुंदर दृश्यं मनात साठवत या मोहक दरीला अलविदा म्हणावे लागते.