
>> विशाल फुटाणे
शिलालेख हे प्राचीन संस्कृतीचे मूक साक्षीदार. या शिलालेखांचा अभ्यास करताना सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक असे अनेक संदर्भ सापडतात. या संदर्भांचे विश्लेषण करणारे, अधिक माहिती देणारे हे सदर.
इ. सन 1172 च्या जवळपास 950 वर्षांपूर्वीच्या कन्नड शिलालेखात भीमा नदीची आरती, तिच्या सौंदर्याचे वर्णन आले आहे.
भारतातील नद्यांचा उल्लेख केवळ धार्मिकच नाही, तर साहित्यिक आणि काव्यात्मक दृष्टिकोनातूनही झाला आहे. विजयपूर जिह्यातील अगरखेडा (इंडी तालुका) येथे सापडलेल्या शिलालेखात भीमा नदीचं इतकं अप्रतिम चित्रण आहे की, ते वाचताना जणू नदी आपल्या डोळ्यांसमोर सजीव होते. नदी म्हणजे केवळ वाहतं पाणी नाही. नदी म्हणजे संस्कृतीचा प्रवाह, पिढय़ान्पिढय़ा सांगितली गेलेली पौराणिक आख्यायिका आणि इतिहासाच्या शिळांवर कोरलेले शब्द. अशीच एक कथा आपल्याला भीमा नदीच्या तीरावर सापडलेल्या शिलालेखातून समजते.
या शिलालेखात शिवाच्या एका अनोख्या आख्यायिकेचा उल्लेख आहे. त्रिपुरासुरांचा संहार करताना महादेवांच्या ललाटावरून पडलेला घामाचा थेंब पृथ्वीवर आला. त्या एका थेंबापासून निर्माण झाली पवित्र धारा भीमा नदी. या पवित्र प्रवाहात स्नान करणाऱयांची अनेक जन्मांची पापं धुऊन जातात, अशी श्रद्धा लेखात स्पष्टपणे दिसते. शिलालेखात नदीचं अप्रतिम वर्णन आहे.
‘पूर्वाभिमुखी वाहणारी, दक्षिण तीरावर पसरणारी, पर्वतरांगांनी वेढलेली, निर्झरप्रवाहांनी सुशोभित भीमरथी…’
असं चित्रण आपल्याला तिथल्या वातावरणात घेऊन जातं. फक्त नदीच नाही, तर तिच्या काठावरच्या पुण्यवनात ऋषी-मुनींची आश्रमं होती. अगस्ती ऋषीपासून ते असंख्य सिद्ध, तपस्वी, चिरंजीव मुनी येथे वस्ती करून तपश्चर्या करत होते. म्हणजेच हा परिसर केवळ पाण्याचा स्रोत नव्हता, तर तो धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र होता. आज आपण ही नदी पाहतो तेव्हा कधी ती धरणांच्या पाण्यात अडकलेली दिसते, तर कधी उन्हाळ्यात कोरडी पडलेली, पण शिलालेख सांगतो तो काळ वेगळाच होता. त्या काळात नदी देवत्वाचं प्रतीक, श्रद्धेचा आधार आणि जीवनाचा पाया होती.
भीमा नदीवर लिहिलेला हा शिलालेख फक्त पाषाणावर कोरलेले शब्द नाहीत. ते आपल्याला आठवण करून देतात की, आपल्या नद्या या पौराणिक वारशाच्या वाहत्या शिला आहेत. नदीकाठचा प्रत्येक वाळूचा कण, प्रत्येक प्रवाह, प्रत्येक लाट एक कथा सांगतो आणि ती कथा आपल्याला भूतकाळाशी जोडते, वर्तमानाला अर्थ देते आणि भविष्याला दिशा दाखवते. शिलालेखात भीमरथीचं वर्णन ‘श्री भीमरथी प्रसिद्ध नदी’ अशा थाटात सुरू होतं. नदीचं रूपक एक सुंदर स्त्राr म्हणून केलं आहे.
तिच्या कमलमुखी तरंगमालिका जणू मोहक हास्यासारख्या वाटतात. कोमल बाहूजोडीसारख्या तिच्या उपनद्या आहेत, ज्या तिला आलिंगन देतात. तिचे प्रवाह रक्तवर्णी डोळ्यांसारखे चमकतात. चक्रवाक पक्ष्याच्या उडालेल्या प्रमाणे रमणीय पाणी तिच्या अंगावर सजलं आहे. तिचे स्थूल नितंब म्हणजे नदीच्या काठावर पसरलेली सुपीक भूमी. तिच्या भोवती निराजसारख्या (सुगंधी) स्वासिक फुलांचा सुगंध दरवळतो. तरंगांवर भ्रमरांचे गुंजन सतत ऐकू येतं.
शेवटी शिलालेखकार ठाम सांगतो की,
‘ही भीमरथी गंगेला समकक्ष आहे.’
हा उल्लेख दाखवतो की, त्या काळात भीमा नदी केवळ सिंचनाची वा प्रवासाची साधन नव्हती, तर ती काव्य, श्रद्धा आणि संस्कृतीचा केंद्रबिंदू होती. भीमेला गंगेच्या तोडीस तोड गौरव एक हजार वर्षांपूर्वी मिळाल्याने आज आपणही अभिमानाने सांगू शकतो की, आपल्याच भूमीतली ही नदी इतिहास, साहित्य आणि अध्यात्म यांची समृद्ध परंपरा जपणारी आहे. भीमा नदी ही महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमाभागात वाहत जाते आणि तिच्या तीरावर वसलेल्या असंख्य तीर्थक्षेत्रांमुळे आजही पूजनीय आहे. पंढरपूरच्या विठोबापासून गाणगापूरच्या दत्तात्रेयापर्यंत, कुडळच्या मल्लिकार्जुनापासून मंगळवेढय़ाच्या सिद्धेश्वरापर्यंत या नदीचा प्रवास म्हणजे जणू एक अखंड तीर्थयात्रा महामार्गच. शैव वैष्णव, दत्त, लिंगायत, शक्तिपरंपरा अशा विविध संप्रदायांचा संगम या नदीकाठी झाला आहे. त्यामुळे भीमा ही केवळ एक नदी नसून संपूर्ण धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा जीवनदायी प्रवाह आहे.
[email protected]
(लेखक इतिहास व पुरातत्व संशोधक आहेत)