
>> प्रसाद ताम्हनकर
कश्मीरमधील पुलवामा हे सतत चर्चेत असलेले एक ठिकाण आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने पुलवामाचा उल्लेख हा सतत बातम्यांमध्ये येत असतो. या पुलवामा जिह्यात वसलेले सुंदर गाव म्हणजे ऑखो होय. हे गाव पेन्सिलीचे गाव म्हणूनदेखील ओळखले जाते. पेन्सिल बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल इथे तयार होतो आणि नंतर बाहेर पाठवला जातो. मात्र पेन्सिल बनवण्यासाठी लागणाऱया पॉपुलर / पॉपलर झाडांच्या कत्तलीमुळे या व्यवसायाला मोठा धोका निर्माण झालेला आहे. या झाडांमुळे श्वसनाचा विकार पसरतो असे कारण देत सरकारने मोठय़ा प्रमाणावर या झाडांची कत्तल केली आहे. मात्र या दाव्यामागे कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नसल्याचे इथले व्यावसायिक सांगतात.
ऑखो गावात एकूण चार पेन्सिल कारखाने आहेत आणि इथून पंधरा किलोमीटर दूर असलेल्या लासीपोरामध्ये नऊ कारखाने आहेत. सरकारने झाडांची बेसुमार कत्तल तर केली. मात्र तोडलेल्या झाडांच्या जागी पुरेशी अशी नवी झाडे लावलेली नाहीत आणि त्यामुळे या व्यवसायाचे भविष्य अंधारात गेल्याची तक्रार इथले व्यावसायिक करत आहेत. कश्मीरच्या सामाजिक वनीकरण खात्याने मात्र ही तक्रार फेटाळून लावताना 2020 साली एक नवे धोरण आखून या झाडांची कत्तल थांबवण्यात आल्याचे नमूद केले आहे. सर्वात आधी 2015 साली जम्मू-कश्मीर हायकोर्टाने ही झाडे तोडण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर 2019 साली सरकारनेदेखील असा आदेश काढला आणि लाखोंच्या संख्येने या झाडांची कत्तल करण्यात आली.
उद्योगासाठी अत्यावश्यक असलेल्या या पॉपलर झाडाचे एकूण 9 प्रकार कश्मीरमध्ये आढळतात. हे झाड घरे बांधताना घराच्या छतासाठीदेखील वापरले जाते. काश्मिरी भाषेत त्याला फ्रास असे म्हणतात. या पॉपलर झाडाच्या ‘रुसी पॉपलर’ या जातीच्या झाडांची कत्तल करण्याचे आदेश काढण्यात आलेले होते. खरे तर झाडाच्या या प्रकाराचा आणि रशियाचा काही संबंध नाही. हे एक अमेरिकन झाड आहे, जे वर्ल्ड बँकेच्या सहयोगाने सुरू झालेल्या एका कार्यक्रमाच्या अंतर्गत 1982 साली कश्मीरमध्ये पोहोचले. या झाडातून कापसासारखे दिसणारे तंतू बाहेर पडतात आणि ते डोक्याला चिकटले की, कोंडय़ासारखे (रुसी) दिसतात. म्हणून या झाडाला नाव पडले रुसी पॉपलर.
हिंदुस्थानच्या वन सर्वेक्षण खात्याच्या अंदाजानुसार पॉपलर झाडांशी संबंधित व्यवसाय वर्षाला एकूण 600 कोटी रुपयांची उलाढाल करतात. एकटय़ा पेन्सिल व्यवसायाचा यामध्ये 150 कोटींचा वाटा आहे. सरकारने रोगाचे कारण सांगत लाखोंच्या संख्येने झाडे तर तोडली. मात्र नव्याने लावण्यात कोणताही रस दाखवला नाही ही तक्रार इथे प्रामुख्याने ऐकायला मिळते. हे सर्व असेच सुरू राहिले तर पुढील तीन वर्षांत काम थांबवण्याची वेळ येईल अशी भीती स्थानिक व्यक्त करतात. पॉपलर झाडापासून पेन्सिलसोबत प्लायदेखील बनवला जातो. हे व्यवसाय इथल्या हजारो लोकांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे उत्पन्नाचे साधन आहे.
पेन्सिल बनवण्यासाठी लागणारे लाकूड कश्मीरच्या बाहेरदेखील उपलब्ध आहे. मात्र कश्मीरमधील लाकूड हे सर्वोत्तम मानले जाते. हिंदुस्थान पेन्सिल बनवण्यासाठी 82 देशांमध्ये लाकडाची निर्यात करतो. हे लाकूड कश्मीरमधील असल्याचे इथले व्यावसायिक सांगतात. कच्चा मालाच्या पुरवठय़ात या क्षेत्राने जर्मनी आणि चीनलादेखील मागे टाकलेले आहे. लाकूड कामाच्या अनेक क्षेत्रांत वापर केले जात असलेले हे लाकूड कश्मीरमधील सर्वात मोठा व्यवसाय मानला जात असलेल्या सफरचंद उद्योगासाठीदेखील महत्त्वाचे आहे. सफरचंदाच्या पॅकिंगसाठी लागणाऱया पेटय़ादेखील या झाडाच्या लाकडापासून बनवण्यात येतात. अनेक तरुणांना या झाडाने स्वतच्या पायावर उभे राहण्यास, व्यवसाय करण्यास मदत केली आहे. या झाडासाठी त्यांच्या मनात एक वेगळी प्रेमभावना आहे. सरकारने त्यांच्या तक्रारीची दखल घ्यावी आणि त्यांना योग्य ती मदत मिळवून द्यावी येवढीच त्यांची अपेक्षा आहे. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये या गावाचा आणि इथल्या पेन्सिल व्यवसायाचा कौतुकाने उल्लेख केल्यापासून स्थानिकांचा अपेक्षा अधिक उंचावलेल्या आहेत.