स्मार्ट मीटर तक्रारींचा ढीग महावितरणच्या तोंडावर मारणार, शिवसेनेची मोहीम सुरू

महावितरणच्या स्मार्ट मीटरला ग्राहकांचा विरोध असतानाही ते मीटर टिओडी या गोंडस नावाने वीज ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटरच्या विरोधात असलेल्या तक्रारींचा ढीग महावितरणच्या तोंडावर मारून स्मार्ट मीटरला विरोध नाही म्हणणाऱ्या महावितरणची झोप शिवसैनिक उडवणार आहेत. आजपासून स्मार्ट मीटरच्या तक्रारी गोळा करण्याची मोहीम शिवसेनेने सुरू केली आहे.

महावितरणच्या स्मार्ट मीटर संदर्भात आज शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी मार्गदर्शन केले.माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले की, स्मार्ट मीटर बाबत आपण एक अर्ज तयार केला आहे.तो अर्ज तक्रारदार वीज ग्राहकांकडून भरून घ्यायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत हे अदानीचे स्मार्ट मीटर आपल्याला बंद करायचे आहेत. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत सांळुखे, शहरसंघटक प्रसाद सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

१० हजार तक्रार अर्ज सादर करणार

स्मार्ट मीटर बाबत पहिल्या टप्प्यात पाच हजार तक्रार अर्ज भरून घ्यायचे आहेत. स्मार्ट मीटरमुळे प्रचंड वीज बील आल्याने ग्राहक संतापले आहेत.आपण त्यांच्या तक्रारी नोंदवून घेऊ. दुसऱ्या टप्प्यात पाच हजार अर्ज भरून या सर्व तक्रारी महावितरणच्या कार्यालयात सादर करू असे माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले.