हवाई दलाला 114 लढाऊ राफेलची गरज, ‘मेड इन इंडिया’ विमानासाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला प्रस्ताव

हिंदुस्थानी हवाई दलाला 114 ‘मेड इन इंडिया’ राफेल लढाऊ विमानांची आवश्यकता आहे. यासाठी हवाई दलाच्या अधिकाऱयांनी संरक्षण मंत्रालयाकडे यासंबंधीचा एक प्रस्ताव पाठवला आहे. जी लढाऊ राफेलची विमाने बनवली जातील, ती ‘मेड इन इंडिया’ असतील. तसेच त्यात 60 टक्के घटक हे स्वदेशी असतील, असे म्हटले आहे. या प्रस्तावाची अंदाजे किंमत 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. हिंदुस्थानी हवाई दलाकडून काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाला केस स्टेटमेंट (एसओसी) प्रस्ताव प्राप्त झाला आहे. संरक्षण आणि वित्त यासह इतर विभाग त्यावर विचार करत आहेत, असे संरक्षण अधिकाऱयांनी सांगितले आहे. विचारविनिमयानंतर हा प्रस्ताव संरक्षण खरेदी मंडळ (डीपीबी) आणि नंतर संरक्षण अधिग्रहण परिषदेकडे (डीआरसी) पाठवला जाईल. जर फ्रान्ससोबतचा हा करार अंतिम झाला, तर तो हिंदुस्थान सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार असेल, असेही संरक्षण अधिकाऱयांनी सांगितले.

l संरक्षण मंत्रालयाने 114 राफेल विमानांच्या कराराला मंजुरी दिल्यानंतर हिंदुस्थानी लष्कराच्या ताफ्यात राफेल विमानांची संख्या 176 पर्यंत वाढेल. हवाई दलाने आधीच 36 राफेल विमाने समाविष्ट केली असून नौदलाने 26 राफेल मरीन विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे ही संख्या 176 पर्यंत जाईल. जूनमध्ये हिंदुस्थान आणि फ्रान्समध्ये 26 राफेल सागरी विमानांसाठी करार झाला होता. या करारानुसार, हिंदुस्थान फ्रान्सकडून 22 सिंगल सीटर विमाने, 4 डबल सीटर विमाने खरेदी करणार आहे. यासाठी हिंदुस्थान 63 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.