
ठाणेकरांना डेंग्यू, मलेरियाच्या डासांनी चांगलाच डंख मारला आहे. शहरात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून गेल्या तीन महिन्यांत डेंग्यूचे 279 तर मलेरियाचे तब्बल 336 रुग्ण आढळले आहेत. यंदा रुग्णांच्या आकडेवारीमध्ये झपाट्याने वाढ झाली असल्याने ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. दरम्यान, प्रत्यक्षात तापाच्या आणि सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
पावसाळा सुरू झाला की साथरोगांचे रुग्ण वाढत असतात. यामध्ये डेंग्यू, मलेरिया आणि इतर आजारांच्या रुग्णांचा समावेश असून खासकरून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी पालि का प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 या तीन महिन्यांत डेंग्यूचे 279 तर मलेरियाचे 336 रुग्ण आढळले. खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची आकडेवारी यापेक्षा जास्त असण्याची शक्यता पालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे
- काय काळजी घ्यावी?
घराजवळ किंवा इमारतीत, चाळीत, वस्तीत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. कुठे डबकी तयार झाली असतील तर ती बुजवावीत. - कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी, घरातल्या टाक्या, कळशा किंवा पाणी साठवण्याची भांडी झाकलेली असतील याची काळजी घ्यावी.
- पाणी ठराविक दिवसांनी बदलावे. डास घरात येऊ नयेत म्हणून आवश्यक ती काळजी घ्यावी. घरात स्वच्छता राखावी.
- खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. आवश्यकतेनुसार कीटकनाशकांचा वापर करावा. शाळा तसेच कामाच्या ठिकाणी ही काळजी घ्यावी.
डॉक्टरांचा सल्ला घ्या!
तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या, ग्रंथींना सूज, रॅशेस यापैकी कोणतीही लक्षणे असतील तर डेंग्यू किंवा मलेरिया झालेला असू शकतो. त्यामुळे ही लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
बॅनर्सच्या माध्यमातून जनजागृती
शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. यामध्ये डेंग्यूच्या संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. या बॅनर्सच्या माध्यमातून आजारांची लक्षणे कशी ओळखावी याची माहिती देण्यात आली आहे. तसेच आजार होऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे याची माहिती देण्यात आली आहे.