मेट्रोच्या गर्डरवरून 30 किलोचा लोखंडी जॅक जमिनीवर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

ठाण्यात मेट्रोचा रॉड कारवर कोसळल्याची घटना ताजी असतानाच भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सर्कल या भागात गर्डरवरून 30 किलो वजनाचा लोखंडी जॅक जमिनीवर कोसळला असल्याची घटना उघडकीस आले आहे. सर्कल परिसरात नेहमी वाहनांची तसेच नागरिकांची वर्दळ वसते, पण केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. यापूर्वीदेखील अनेकदा असे अपघात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मेट्रोचे काम एमएमआरडीए करीत आहे की ‘यमयमआरडीए’ असा संतप्त सवाल भाईंदरवासीयांनी केला आहे.

काल्हेर येथील अमोल लाठे हे आपल्या 83 वर्षीय वडिलांना घोडबंदर येथे खासगी रुग्णालयात घेऊन जात होते. रुग्णालय बंद असल्याने पुन्हा काल्हेरला जात असताना कापूरबावडी भागात त्यांच्या कारवर मेट्रोचा रॉड पडला. भाईंदरमध्येही शनिवारी अशीच घटना घडली आहे. सुरक्षेची कोणतीही काळजी कंत्राटदाराने न घेतल्याने गोल्डन नेस्ट सर्कल येथे मेट्रोच्या गर्डरवरून मोठा लोखंडी जॅक थेट खाली कोसळला.

‘त्या’ सुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा
ठाण्यातील कापूरबावडी येथे कारवर मेट्रोचा रॉड कोसळल्याप्रकरणी एमएमआरडीएच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी प्रतीक मोहिते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. काल्हेर येथील अमोल लाठे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

ठेकेदाराला 10 लाखांचा दंड
गोल्डन नेस्ट सर्कल येथे हायड्रोलीक जॅक यू गर्डरचे लोअरिंग ऑपरेशन सुरू होते. त्याचवेळी अचानक जॅक जमिनीवर कोसळला. या भागात नागरिकांची सतत वर्दळ असते. चहाचे स्टॉल्स, गॅरेजेस, दुकानेही मोठ्या प्रमाणावर आहेत. जॅक जमिनीवर कोसळला तेव्हा तिथे कोणीच नव्हते. त्यामुळे कुणीही जखमी झाले नाही. मात्र एमएमआरडीएविरोधात नारिकांनी संताप व्यक्त केला. कोणाचा जीव जाण्याची अधिकारी वाट पाहत आहेत काय, असाही सवाल करण्यात आला. अखेर त्याची गंभीर दखल घेत ठेकेदार जे. कुमार याला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी ‘एक्स’ पोस्टवरून दिली, तर या घटनेनंतर उपकंत्राटदारालादेखील काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.