पुण्यात जिथे पाच लोक राहायचे तिथे 300 जण राहतात, नागरी प्रश्नांवर शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता

पुण्यात पूर्वी ज्या जागेवर पाच लोक राहत होते, तिथे आज ३००-४०० लोक राहतात. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा मिळतात का? कायदा-सुव्यवस्थेची हमी आहे का? आज पुण्यात आणि आजूबाजूला प्रचंड नागरी प्रश्न निर्माण झाले आहेत. दळणवळण वाढले आहे. सर्वात जास्त दुचाकी पुण्यात आहेत. या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सक्षम महापालिका हवी, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आयोजित पुणे शहर कार्यकारिणीची ५० वी मासिक आढावा बैठक व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे, जगन्नाथ शेवाळे, आमदार बापू पठारे, माजी आमदार अशोक पवार, जयदेव गायकवाड, प्रकाश म्हस्के, रवींद्र माळवदकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुण्यातील नागरी समस्यांबद्दल शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, पुणे हे पहिल्यापासून काँग्रेसी विचारधारेसोबत राहिलेले शहर आहे. त्यामुळे पुण्याची जबाबदारी ऐतिहासिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गांधी-नेहरूंच्या विचारधारेवर चालतो. ही विचारधारा अधिक मजबूत करणे, हे आपल्यासमोरील मोठे काम आहे. त्यादृष्टीने आपल्याला काम करायचे आहे. महापालिका आपल्या तसेच सहकाऱ्यांच्या हातात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

प्रशांत जगताप म्हणाले, आगामी पालिका निवडणुकीसाठी तयारी झाली असून, पक्ष म्हणून आम्ही तयार आहोत. मात्र, आघाडी किंवा महाआघाडी निर्णय लवकर झाला पाहिजे. शहरात सत्ताबदल होणे गरजेचे आहे. पुणे वाहतूककोंडीत जगात पाचव्या नंबरला आले आहे. अंकुश काकडे म्हणाले, ३१ जानेवारीच्या आत निवडणुका झाल्या पाहिजेत, असे आज कोर्टाने सांगितले. निवडणुका कधीही होऊ द्या. मात्र, येत्या निवडणुकीत महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा महापौर होईल, या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. स्वाती पोकळे, आमदार बापू पठारे, माजी आमदार जयदेव गायकवाड, उदय महाले, गणेश नलावडे, जुबेर शेख, शशिकांत तापकीर आदींनी मनोगत व्यक्त केली.

आघाडीचा निर्णय वरिष्ठ घेतील

उद्याच्या महापालिका निवडणुकांमध्ये कुणाशी आघाडी करायची, किती जागांवर लढायचे याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि इतर पक्षातील अध्यक्ष, वरिष्ठ नेते एकत्र घेतील. सगळ्या जागा आपल्याला मिळणार नाहीत; पण ज्या जागांवर संधी मिळेल त्याठिकाणी कार्यकत्यांच्या विश्वासावर निवडणुकीला सामोरे जायचे आहे. काही पक्ष देशपातळीवर सहकार्य करतात, काही राज्य पातळीवर त्यानुसार निर्णय होईल. मात्र, कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.