
>> जयेश शहा
कांद्याचा उत्पादन खर्चदेखील वसूल होत नसल्याने आणि वखारीत खराब होत असलेला कांदा पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांनी दुप्पट भाव देऊन कांदा बियाणे खरेदी केले होते. त्यातच रोपे वाया जाणे, मे महिन्यातील अवकाळी पाऊस, भिजलेला कांदा या सर्वांचा परिणाम साठवणीवर झाला आहे. सुरुवातीच्या काळात – पोषक वातावरण असल्यामुळे चांगला कांदा तयार झाला होता, शेतकऱ्यांनी चांगला बाजारभाव मिळेल या आशेने कांदा साठवणूक केली होती, मे – महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने कांद्याच्या साठवणूक वखारीमध्ये – २० टक्के कांदा खराब निघायला लागल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. कांदा पीक हे तयार होईपर्यंत सुमारे बारा रुपये किलोला खर्च येत आहे त्यानंतर वाहतूक पॅ केजिंग साठवणूक हा खर्च वेगळा होतो. सध्या बाजारात १० ते १३ रुपये एवढा बाजारभाव मिळत आहे.
उत्पन्न खर्चदेखील मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना शासनाने कांद्यासाठी अनुदान जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. दरम्यान, केंद्र शासनाने कांद्याला एक्स्पोर्ट करण्याची परवानगी जरी दिली असली, तरी मागील वर्षभर कांदा एक्स्पोर्टवर बंदी असल्यामुळे कांदा आयात करणाऱ्या देशांनी इतर देशांच्या बाजारपेठ शोधून त्या बाजारपेठेतून स्वस्त किमतीत कांदा उपलब्ध करून घेतला. त्यामुळे म्हणावा असा कांदा एक्स्पोर्ट होत नाही. दरम्यान, चाळीत साठवलेला कांदा अवघ्या तीन महिन्यांत सडू लागला. काही शेतकऱ्यांचा कांदा तर मोड धरल्याने विक्रीयोग्य राहिलेला नाही.
शासकीय धोरण कारणीभूत
केंद्र सरकारच्या धरसोड निर्यात धोरणांमुळे भारतीय कांद्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गमावली आहे. एकेकाळी जवळपास ४५ टक्के होत असलेली निर्यात आता ७/८ टक्केपर्यंत घसरली आहे. नाफेड आणि एनसीसीएफने शेतकऱ्यांकडून १२/१३ रुपयांनी खरेदी केलेला कांदा आता बाजारात २४ रुपयांनी विक्रीस काढला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीला केवळ शासकीय धोरणंच कारणीभूत आहेत. सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकिलो १० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पानसरे यांनी केली.
सध्या बाजारात मार्च महिन्यात काढलेला उन्हाळी कांदा विक्रीस येत आहे. मोठ्या प्रमाणावर खते औषधे वापरून तयार केलेल्या कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही, अजून साठवणूक केलेला जुन्या कांद्यालाच बाजार मिळत नसल्याने तो वखारीत पडून आहे
– बापू येलभर, शेतकरी.
आम्ही सुमारे ५०० क्विटल कांद्याचे उत्पादन घेतले आहे. चांगल्या भावाच्या आशेने कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला आहे. त्यापैकी ५० टक्के कांदा सडला आहे. उर्वरित कांदा किती दिवस टिकवायचा हा प्रश्न आहे.
संतोष देवराम टाव्हरे, शेतकरी
” सध्या चाळीस टक्के कांदा विक्री झाला असून, अजून शेतकऱ्यांकडे ६० टक्के कांदा शिल्लक आहे. त्यातील २० टक्के कांदा हा खराब निघू शकतो. त्यात सध्या बाजारभाव १० ते १३ रुपये मिळत आहे, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ४० ते ४४ रुपये कांद्याला बाजारभाव मिळत होता. लवकरच नवीन कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साठवणूक केलेल्या कांद्याला बाजारभाव मिळेल का नाही हा प्रश्नच आहे.
श्याम टाव्हरे, कांदा व्यापारी.