मराठवाड्यात सरकारच्या अब्रूची धिंड निघाली; मंत्र्यांचे ताफे अडवले, आत्मदहनाचा प्रयत्न, गृहखात्याचे मोठे अपयश

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री मराठवाडा दौऱ्यावर आहेत. संबंधित मंत्र्यांच्या हस्ते विविध ठिकाणी ध्वजारोहण आणि हुतात्म्यांना अभिवादन केले जात आहे. राज्याचे प्रमुख नेते मंडळी मराठवाड्यात येत असल्याने पोलिसांकडून चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला. मात्र मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनाही जनतेचा रोषाचा सामना करावा लागला. मराठा-ओबीसी आरक्षण ते इतर स्थानिक मुद्द्यांवरून नागरिकांनी मंत्र्यांचे ताफे अडवले, घोषणाबाजीही केली. काही ठिकाणी आत्मदहनाचाही प्रयत्न करण्यात आला. हे गृहखात्याचे मोठे अपयश असून मराठवाड्यात सरकारच्या अब्रूची धिंड निघाल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे.

मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीस समाज संतप्त झाला असून त्याचे पडसाद मराठा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात उमटले. ‘ओबीसींवर अन्याय करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध असो‘, या घोषणा देत काही आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून ‘हैदराबाद गॅझेट रद्द करा, ओबीसींवर अन्याय करू नका‘, अशा घोषणा देत गोंधळ घातला. यावेळी ओबीसी नेते राजूभाऊ पेरकर यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अजित पवारांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. अजित पवार यांचा ताफा ध्वजारोहणासाठी पोलीस ग्राऊंडकडे निघालेला असताना केज तालुक्यातील दोन तरुणांनी त्यांच्या ताफ्यासमोर धाव घेत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

प्रताप सरनाईक यांच्यासमोर घोषणाबाजी

धाराशिवचे पालकपमंत्री प्रताप सरनाईक यांनाही नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. मराठवाडा मुक्तिसंग्राम ध्वजारोहण कार्यक्रमात परंडा तालुक्यातील खासापुरी येथील एका युवकाने विविध मागण्या मान्य होत नसल्याच्या कारणामुळे गोंधळ घातला. सदरील युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बाजरीच्या कणसाची माळ घालून आंदोलन

बीडमध्ये अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला कार्यकर्तीने गळ्यात बाजरीच्या कणसाची माळ घालून आंदोलन केले. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच लाडकी बहीण योजना जाहीर करून सत्तेचा मलिदा खाण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.

बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण द्या

बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटीयर लागू करा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवींद्र पवार यांनी सिद्धार्थ उद्यानासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याना ताब्यात घेतले आहे.