बर्फाची भाववाढ; मच्छीमार संस्था, पुरवठादारांमध्ये उडाली जोरदार खडाजंगी, विरोध केल्यास सप्लाय बंद करू

बर्फाच्या दरात दीड महिन्यात दुसऱ्यांदा वाढ करण्याचा निर्णय ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन घेतल्यामुळे मच्छीमार संतप्त झाले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आज आयोजित केलेल्या बैठकीत आईस मॅन्युफॅक्चर आणि मच्छीमार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. १ ऑगस्ट रोजी बर्फाचा दर प्रतिटन ८० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. दीड महिन्यानंतर आता पुन्हा टनामागे ८५ रुपये वाढण्याची मागणी आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशनने केली आहे. त्यामुळे या दरवाढीला मच्छीमारांनी विरोध केला आहे. दरम्यान जर नवीन दरानुसार बर्फ घेतला नाही तर मच्छीमार संस्था व बोटींना बर्फाचा पुरवठा बंद करण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.

१ ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यानंतर बर्फ पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी महागाई, मजुरी, मीठ, अमोनिया यांच्या किमती वाढल्याने बर्फाच्या प्रतिटनामागे तब्बल ८० रुपयांची वाढ केली होती. यामुळे बर्फाचे भाव प्रतिटन २३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आता पुन्हा ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशनने वीज दरवाढीचे कारण पुढे करत प्रतिटनामागे आणखी ८५ रुपयांची वाढ करण्याची मागणी केली आहे. यामुळे मच्छीमार व मच्छीमार संस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बर्फाच्या दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

करंजा मच्छीमार संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष सुरजित सिंग, रिझवान दोसाणी, करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, रमेश नाखवा, के. एल. कोळी, नारायण नाखवा, चेतन नाखवा, रवी कोळी, बर्फ सप्लायर्स आणि विविध मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरवाढीचा प्रस्ताव मान्य न केल्यास कुलाबा, भाऊचा धक्का, करंजा आदी बंदरांतील बर्फ पुरवठा बंद करण्याचा इशाराही सुरजित सिंग यांनी यावेळी दिला. त्यानंतर बर्फाच्या भाववाढीवर सप्लायर्स आणि मच्छीमार य

सुधारित दरवाढ शनिवारपासून लागू होणार

असोसिएशनने जाहीर केलेली सुधारित दरवाढ येत्या शनिवारपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती सुरजित सिंग यांनी बैठकीत दिली. त्यावर मच्छीमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बर्फाच्या दरवाढीबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री, आयुक्त, मच्छीमार संस्थांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्याची मागणी करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केली. तोपर्यंत बर्फाच्या दरात वाढ करून नये, असा प्रस्तावही नाखवा यांनी मांडला.