
ठेकेदाराने रस्ता काम करताना खोदलेल्या नालीतून शेतात पाणी साचत आहे. पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. हे पाणी बंद करून शेतात जाण्यासाठी वाट करुन द्या, अशी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यालाच अधिकाऱ्यांनी धमक्या दिल्या. घटनास्थळी पंचनामा करताना “तुझ्यावरच गुन्हा दाखल करु”, अशी दमबाजी करत सर्वांसमोर अपमानित केले. यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने सर्वांसमोर थेट विहिरीत उडी घेऊन जीव दिला. ही भयंकर घटना पैठण तालुक्यातील खादगाव येथे मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान, मयत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी महसूलच्या दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली. चर्चा व आश्वासनानंतर 5 तासाने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयातून मृतदेह नेण्यात आला.
पैठण तालुक्यातील खादगाव ते खेर्डा रस्त्याच्या कामासाठी संबंधीत ठेकेदाराने दुतर्फा खड्डे खोदले आहेत. याद्वारे पावसाचे पाणी संजय शेषराव कोहकडे (व. – 45) यांच्या शेतात येऊन पिकाची नासाडी होऊ लागली. त्यामुळे वरील शेतकऱ्याने तहसील कार्यालयात तक्रार केली होती. चुकीच्या पद्धतीने खड्डे खोदल्यामुळे शेतात पाणी साचून पिकांची नासाडी होत असून पाण्यामुळे शेतात जायला रस्ता नाही, असे निवेदन दिले होते.
या पार्श्वभूमीवर बालानगरच्या महसुल मंडळाधिकारी शुभांगी शिंदे व खादगाव सज्जाचे तलाठी लक्ष्मीकांत गोजरे हे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले. ग्रामस्थांसह तक्रारदार शेतकरी संजय कोहकडे हेसुद्धा उपस्थित होते. पंचनामा सुरू असताना प्रतिवादीही घटनास्थळी आले. त्यांनी तलाठी व मंडळाधिकारी यांचेशी त्यांची काहीतरी कुजबूज केली. यानंतर मंडळाधिकारी शुभांगी शिंदे व तलाठी लक्ष्मिकांत गोजरे या दोघांनी तक्रारदार शेतकरी संजय कोहकडे यांस चारचौघांत “विनाकारण अडथळे आणू नको. पुन्हा काही केले तर गुन्हा दाखल करीन” अशी धमकी दिली.
गावातील लोकांसमोर हा प्रकार घडला. त्यामुळे शेतकरी संजय कोहकडे हे अपमानित झाले आणि पंचनामा सुरू असतानाच भांबावलेल्या हतबल स्थितीत ते स्वतःच्या विहिरीकडे धावले. सर्वांसमोर विहिरीत उडी घेतली. पोहता येत नसल्याने त्यांचा मदती पूर्वीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने संजय कोहकडे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. उत्तरणीय तपासणीसाठी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी मयत संजय कोहकडे यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली.
अधिकाऱ्याच्या चुकीमुळे शेतकरी संजय कोहकडे यांचा बळी गेल्याने नातेवाईक आक्रमक झाले. त्यांनी जोपर्यंत मंडळधिकारी, तलाठी व संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत आम्ही उत्तरीय तपासणी करून देणार नाही. मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा घेतला. अखेर पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत, पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते व पोलीस नाईक रविंद्र आंबेकर यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन मृताच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी परवानगी दिली. आज याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.