
बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. निवडणूक आयोगाने अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत. मात्र, मतदानाच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. निवडणूक आयोग बिहारमधून एक नवा प्रयोग सुरू करत आहे, ज्याअंतर्गत आता ईव्हीएम बॅलेट पेपरवर उमेदवारांची रंगीत छायाचित्रे असतील. यापूर्वी छायाचित्रे ब्लॅक अँड व्हाईट असायची.
आता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या बॅलेटवर उमेदवारांची छायाचित्रे रंगीत छापली जातील. हा प्रयोग सर्वप्रथम बिहारमध्ये होत असून, नंतर इतर राज्यांमध्येही लागू केला जाणार आहेत असे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.
आता उमेदवाराचा चेहरा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या बॅलेट पेपरवरील तीन-चतुर्थांश भागावर असणार आहे. यामुळे मतदारांना उमेदवारांची ओळख पटवणे सोपे जाईल. त्याशिवाय क्रमांकालाही आता आधीपेक्षा अधिक महत्त्व दिले जाणार आहे. ही योजना निवडणुकीची पारदर्शकता वाढवण्यासाठी तसेच मतदारांच्या सोयीसाठी राबवली जात आहे.
हे नवे बदल निवडणूक प्रक्रिया अधिक लोकशाहीवादी, निष्पक्ष आणि सोपी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. बिहारमधून सुरू झालेले हे सुधार लवकरच संपूर्ण देशात लागू करण्याचा विचार आहे, ज्यामुळे देशभरातील निवडणुकांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढेल.
निवडणूक आयोगाची ही योजना लोकशाहीची मुळे अधिक भक्कम करताना मतदान अधिक सुरक्षित आणि प्रभावी बनविण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.