महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात कशी झाली मतचोरी? राहुल गांधीकडून पोलखोल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रामधील ‘राजुरा’ विधानसभेचा देखील उल्लेख केला. राजुरा मतदारसंघामध्ये मतचोरीचा गंभीर आरोप केला. यावेळी त्यांनी मतचोरीचे पुरावे देखील सादर केले. राहुल गांधीच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. राजुरा मतदारसंघात 6,850 नवीन नावे दाखल केली होती. सध्याच्या घडीला या मतदारसंघात नेमकी कुणी बाजी मारली हे आपण पाहुयात.

राजुरा मतदारसंघामध्ये भाजपचे देवराव भोंगळे यांनी काँग्रेसचे जेष्ठ आमदार सुभाष रामचंद्रराव धोटे यांचा 3,054 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. सदर निकाल हा तुलनात्मकदृष्ट्या कमी मताधिक्याने लागला होता. मतचोरीच्या माध्यमातून नावे नोंदवणे आणि हटवणे हा मुद्दा त्यामुळेच आता गांभीर्याने चर्चिला जात आहे.

राजुरा मतदारसंघ

नोंदणीकृत मतदार : 3 लाख 15 हजार 073

पुरुष मतदार : 1 लाख 59 हजार 821

महिला मतदार : 1 लाख 55 हजार 252

मतदान केंद्रे : 344

यावेळी हरियाणा आणि इतर राज्यातही मतचोरी झाल्याचे त्यांनी म्हटले. सदर पत्रकार परिषदेबाबत ते म्हणाले, हा हायड्रोजन बॉम्ब नसला तरी ही सर्व उदाहरणे ही मतचोरीची मोठी उदाहरणं आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मतचोरी करणाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचे सुद्धा त्यांनी म्हटले. तसेच देशभरामध्ये दलित, आदिवासी लोकांचीच नावे मतदार यादीतून वगळण्यात आलेली असल्याचे त्यांनी म्हटले. मतचोरीत टार्गेट करून काँग्रेसचे मतदार डिलीट करण्यात आल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.