माझ्या हॉटेललाही ग्राहक नाही, समजून घ्या! भेटायला आलेल्या पूरग्रस्तांना कंगनांनी ऐकवली स्वतःची व्यथा

‘‘माझ्या रेस्टॉरंटमध्ये काल फक्त 50 रुपयांचा धंदा झाला. मला 15 लाख रुपये पगार द्यावा लागतो. माझी वेदनाही समजून घ्या,’’ अशी व्यथा खासदार कंगना राणावत यांनी त्यांना भेटायला आलेल्या पूरग्रस्तांपुढे मांडली.

पूर व दरड कोसळण्याच्या घटनांमुळे हिमाचल प्रदेशात प्रचंड नुकसान झाले आहे. कंगना खासदार असलेल्या मंडी जिह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. कंगना राणावत जेव्हा या लोकांना भेटल्या, तेव्हा लोक आपले दुःख सांगू लागले. खासदार आपल्याला दिलासा देतील. काहीतरी मदत करतील अशी अपेक्षा या लोकांना होती. एक महिला त्यांच्याकडे प्रशासनाची तक्रार करू लागली तर कंगनांनी तिला दरडावले. ‘‘तुम्ही माझ्यावर डायरेक्ट हल्ला करू नका. मीही माणूस आहे. माझेही मनालीत रेस्टॉरंट आहे. तिथेही ग्राहक नाहीत,’’ असे कंगना म्हणाल्या. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.