
गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या बहुचर्चित पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची मतमोजणी काल रात्री पूर्ण झाली असून नियामक मंडळाच्या सदस्यांची मतमोजणी अपूर्ण आहे. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया शनिवार 20 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊन त्याच दिवशी निकाल येईल.
मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीकडे समस्त साहित्य विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. ऊर्जा पॅनेल आणि डॉ. भालेराव विचारमंच हे दोन गट आमनेसामने आहेत. दोन्ही गटांकडून मतचोरीचे आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. अशातच साहित्य संघात कुणाचे पॅनेल विजयी होणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. ‘‘630 मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली आहे. तर अन्य 12 मतपत्रिका बाजूला काढण्यात आल्या आहेत. त्यावर काही ठिकाणी चुकीचे मतदान झाले आहे, तर एक-दोन मतपत्रिका या हयात नसलेल्या सभासदांच्या असल्याचे आढळून आले आहे. त्यांची पडताळणी सुरू आहे,’’ अशी माहिती निवडणूक अधिकारी यशोधन दिवेकर यांनी दिली. मतमोजणी शनिवारी पूर्ण होऊन निवडणुकीचा संपूर्ण अहवाल त्यानंतर सादर करण्यात येईल, असे दिवेकर यांनी सांगितले.
उषा तांबे पुन्हा अध्यक्षपदी?
मतमोजणीत साहित्य संघाच्या माजी अध्यक्ष उषा तांबे विजयी झाल्याचे समजते. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्या ऊर्जा पॅनेलतर्फे अध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत. उपाध्यक्ष पदासाठी विजय केंकरे, अशोक कोठावळे, सुदेश हिंगलासपूरकर मतमोजणीत आघाडीवर होते, असेही समजते.