मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, साध्वी प्रज्ञासिंहसह सात जणांच्या निर्दोष सुटकेला आव्हान; हायकोर्टाने बजावली नोटीस

sadhvi-pragya-thakur

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित व अन्य पाच आरोपींची विशेष सत्र न्यायालयाने ठोस पुराव्या अभावी सुटका केली. मात्र या निर्णयाला हल्ल्यातील पीडितांनी आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने आज दखल घेत सर्व आरोपींना नोटीस बजावल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट घडवण्यात आला या घटनेत 6 ठार तर 100 हून अधिक जण जखमी झाले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्या विरोधात बेकायदेशिर कारवाया प्रतिबंधक कायदा (युएपीए), आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर श्याम साहू, प्रवीण टकल्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे यांना यात फरार आरोपी दाखवण्यात आले आहे.

अनेक साक्षीदार पुरावे तपासल्यानंतर तसेच सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायालयाने या प्रकरणाचा 31 जुलै रोजी निकाल जाहीर केला व सातजणांची सुटका केली मात्र सत्र न्यायालयाच्या या निकालाला बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात आव्हान दिले. निसार अहमद सय्यद बिलाल व इतर पाच जणांनी अ‍ॅड. मतीन शेख यांच्यामार्फत हे अपील दाखल केले आहे.