
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने एकीकडे कंत्राटदारांची बिले थकली आहेत, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांना मदत, कर्जमाफी दिली जात नाही, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर सोफा आणि डबल बेड मॅट्रेसवर 20.47 लाख, त्याचबरोबर किचन प्लॅटफॉर्म दुरुस्तीवर 19.53 लाख अशी एकूण 40 लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट करत ‘वर्षा’ निवासस्थानी दुरुस्तीच्या कामांसाठी करण्यात येणाऱया लाखो रुपयांच्या खर्चावरून मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे.
राज्यावरील कर्जाचा बोजा 9.5 लाख कोटींच्या वर गेला आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी डबल बेड मॅट्रेस, सोफा आणि किचन दुरुस्तीसाठी 40 लाखांहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई, असा सवाल रोहित पवार यांनी ‘एक्स’ पोस्ट करत केला आहे.