
केडीएमसी निवडणुकीआधीच विकासकामांच्या श्रेयवादातून भाजप आणि शिंदे गटामध्ये धुसफूस सुरू झाली आहे. हे वादाचे ढोल कार्यकर्त्यांची डोकी फुटण्यापर्यंत वाजत आहेत. शहाडमध्ये तर नवरात्रीच्या शुभेच्छांचा बॅनर लावण्याच्या किरकोळ वादातून शिंदे गट-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले.
केडीएमसी कार्यक्षेत्रात शहाडचा समावेश आहे. नवरात्रीच्या शुभेच्छा देणारा बॅनर आपल्या फ्रेमवर का लावला, असा जाब भाजप वॉर्ड अध्यक्ष मोहन कोनकर यांनी शिंदे गटाचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश याला विचारला. याच वादातून दोन्ही गटामध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. या हाणामारीत मोहन कोनकर आणि मुकेश कोट यांच्यासह आणखी एकजण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये बॅनरवरून झालेल्या राड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
चमकोगिरीमुळे उत्सवाला गालबोट
कोर्टाच्या आदेशानुसार जानेवारीपर्यंत पालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नगरसेवकपदाचे इच्छुक उमेदवार भलतेच चार्ज झाले आहेत. शहाड रेल्वे स्थानकाजवळ नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवरून भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची चमकोगिरी डोके फुटण्यापर्यंत गेली. उत्सवाला गालबोट लावणाऱ्या दोन्ही गटांवर शहाडमधील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.