
भाजप वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत ‘तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीकरी गडबड आहे’, असे वादग्रस्त विधान केले. यामुळे पडळकर यांच्यावर चौफेर टीका होत असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांचे कान टोचले आहेत.
सांगली जिल्ह्यातील जत येथे अभियंता आत्महत्या प्रकरणावरून काढण्यात आलेल्या निषेधार्थ मोर्चावेळी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत त्यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. ‘अरे जयंत पाटला, तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात धमक आहे, कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी मी औलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे’, असे विधान पडळकर यांनी केले होते. याचा अजित पवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव घेत अशी विधानं वेदना देणारी असतात आणि फडणवीस त्यांना समज देतील, असे म्हटले.
माध्यमांनी याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, आमचे महायुतीचे सरकार आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींचे किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांच्या काही चुका होत असतील तर भाजपने त्याची नोंद घेतली पाहिजे आणि भूमिका स्पष्ट केली पाहिजे. वादग्रस्त विधानांबाबत महायुतीचे धोरण ठरलेले असून भाजप संदर्भातील जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची असून ते यावर बोलतील.
ते पुढे म्हणाले की, पडळकरांच्या विधानाबाबत मला माहिती नाही, पण कुणी कुठल्याही राजकीय पक्षात असला तरी महाराष्ट्राला वेगळी परंपरा, संस्कृती आहे. राजकारणात सुसंस्कृतपणा दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकाने बोलताना, वागताना अशा प्रकारची वेदना देणारी विधानं करू नये.