Asia cup 2025 – सामना सुरू असताना श्रीलंकेच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचं निधन; कोच, टीम मॅनेजरनं सावरलं

आशिया कप 2025 मध्ये गुरुवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान याच्यात सामना खेळला गेला. हा सामना सुरू असताना श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेलालागे याच्या वडिलांचे निधन झाले. सामना संपल्यानंतर टीम मॅनेजर आणि मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी त्याला ही बातमी दिली. वडिलांच्या मृत्युची बातमी कळताच दुनिथला धक्का बसला आणि त्याचा अश्रू अनावर झाले. या दु:खाच्या प्रसंगात जयसूर्या आणि टीम मॅनेजर दुनिथसोबत खंबीरपणे उभे राहिले आणि त्याला सावरले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

श्रीलंकेचा युवा खेळाडू दुनिथ वेलालागे हा आशिया चषकातील पहिलाच सामना खेळत होता. या लढतील श्रीलंकेने विजय मिळवला. पण काही क्षणात हा आनंद शोकाकूल वातावरणामध्ये बदलला. सामना संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या आणि टीम मॅनेजरने मैदानात जाऊन दुनिथला ही दु:खद बातमी दिली. यानंतर लगेच दुनिथ स्टेडियमबाहेर धाव घेतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

दरम्यान, या लढतीमध्ये दुनिथ वेलालागे याने चार षटकांची गोलंदाजी करत 1 विकेट मिळवली. अफगाणिस्तानच्या डावातील विसावे षटकही त्याने टाकले. मात्र या षटकामध्ये अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबी याने त्याला सलग पाच षटकार ठोकले, मात्र याच षटकात दुनिथने त्याला बादही केले.

दुनिथच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त ऐकून मोहम्मद नबी याला धक्का बसला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत दुनिथच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आणि या दु:खद प्रसंगी खंबीर राहा असे म्हटले.