‘त्या’ पाच षटकारानंतर पित्याला गमावले! श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लालागेवर कोसळला दु:खाचा डोंगर

आशिया कपच्या गुरुवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवून सुपर-4 मध्ये प्रवेश करणाऱया श्रीलंका संघावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. युवा अष्टपैलू दुनिथ वेल्लालागेचे वडील सुरंगा वेलालगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दुर्दैवाने ही घटना तेव्हा घडली, जेव्हा दुनिथ मैदानावर खेळत होता. त्याच्या गोलंदाजीवर अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने सलग पाच षटकार खेचल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली.

सामन्यादरम्यानच श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनी मैदानावरच दुनिथला ही धक्कादायक बातमी दिली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत जयसूर्या त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार देताना दिसत आहेत. ही बातमी ऐकताच दुनिथ भावुक झाला, पण त्याने मैदान सोडले नाही. तो मॅचमध्ये उपस्थित होता. तो फलंदाजीसाठीही तयार होता, पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

दुनिथचे वडील सुरंगा वेल्लालागे हेही माजी क्रिकेटपटू होते. त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेजचं नेतृत्व केले होते. मात्र, त्यांना श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. सामना चालू असताना समालोचक रसेल अरनॉल्डने थेट प्रसारणातच दुनिथ वेल्लालागेचे वडील सुरंगा यांचे निधन झाल्याची बातमी दिली. अफगाणिस्तानविरुद्ध दुनिथची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. त्याने चार षटकांत 49 धावा देत एकच विकेट घेतला होता. मोहम्मद नबीने त्याच्या एका षटकात पाच षटकार ठोकले आणि 22 चेंडूंत 60 धावा कुटल्या. या झंझावातामुळे अफगाणिस्तान 169 धावांपर्यंत पोहोचला होता. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 18.4 षटकांत 4 विकेट राखून हे लक्ष्य गाठले.