
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात सहा महिन्यांत तब्बल 40.81 लाख मतदार वाढले होते. त्यापाठोपाठ राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांत 14 लाख 71 हजार 507 मतदारांची नव्याने भर पडली आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 2 लाख 71 हजार 666 मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती पुढे आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 1 जुलै 2025 पर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यानुसार 27 नोव्हेंबर 2024 ते 30 जून 2025 या सात महिन्यांत महाराष्ट्रातील मतदारसंख्येत 18 लाख 80 हजार 553 इतकी वाढ झाली आहे. तर जुन्या यादीतील 4 लाख 9 हजार 46 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत मतदार यादीत अंतिमतः 14 लाख 71 हजार 507 इतकी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यात 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार होते. विधानसभा निवडणुकीनंतर मागील सात महिन्यांत ही संख्या 9 कोटी 84 लाख 96 हजार 626 इतकी झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 2,71,666 मतदार वाढले आहेत. त्यापाठोपाठ पालघरमध्ये 2,26,451 तर पुणे जिह्यात 1,39,802 मतदार वाढले आहेत.
मुंबई चौथ्या क्रमांकावर
राज्यातील मतदारसंख्या वाढीत मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई शहरात 33 हजार 201 तर मुंबई उपनगरात 1 लाख 8 हजार 116 मतदार वाढले आहेत.
घर बदलल्यामुळे सर्वाधिक वाढ
राज्यात वाढलेल्या 14 लाख मतदारांपैकी सर्वाधिक 1 लाख 96 हजार मतदार हे एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे वाढले आहेत. पुण्यात सर्वाधिक 32 हजार 31 स्थलांतरित मतदार वाढले आहेत. त्यापाठोपाठ ठाण्यात 27 हजार 386 तर मुंबई उपनगरांत हे प्रमाण 25 हजार 831 इतके आहे.