कर्जमुक्ती टाळणाऱ्या सरकारविरोधात गावोगावी संताप; शेतात, घरावर काळे झेंडे लावले

शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही कर्जमुक्ती न करणाऱ्या सरकारविरोधात गावोगावी संताप व्यक्त होत आहे. शेतकरी संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी घरांवर, शेतात काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला आहे.

निफाड तालुक्यानंतर कळवणमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत. बेज येथील शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवीदास पवार यांनी घरावर व शेतात काळा झेंडा लावून शासनाचा निषेध नोंदवला. नैसर्गिक आपत्ती, कोसळणारे शेतीमालाचे भाव, खते-बियाण्यांची दरवाअशा अनेक संकटांमुळे शेतकरी खचला आहे. सरकार मात्र शेतकरीविरोधी धोरणे राबवत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.

भेंडी येथे मनोज रौंदळ, मुळाणेत धनराज महाले, रवींद्र महाले, अशोक महाले, सईबाई रौंदळ, आशाबाई रौंदळ, निवाणे येथील रवींद्र आहेर, मीराबाई आहेर, उषा आहेर यांनीही सरकारचा निषेध केला, संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी केली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली, जप्तीची कारवाई तत्काळ बंद करावी व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर नावे लावणे थांबवावे, अशी मागणी शेतकरी संघटना समन्वय समिती अध्यक्ष भगवान बोराडे, मोतीनाना पाटील यांनी केली आहे.