एसआयटी स्थापनेची घोषणा हवेतच विरली, धुळे रेस्ट हाऊस बेहिशेबी रोकड प्रकरण;  नीतिमूल्य समितीला वाटाण्याच्या अक्षता  महायुती सरकारचे अर्जुन खोतकरांना अभय?

धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या 1 कोटी 84 लाख रुपयांच्या बेहिशेबी रोकड प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.  विधिमंडळाच्या अंदाज समितीवरच आरोप झाल्यामुळे एथिकल कमिटीचीही (नीतिमूल्य समिती) स्थापन करण्याची घोषणा केली होती. पण आतापर्यंत एसआयटी व एथिकल समितीही (नीतिमूल्य समिती) स्थापन झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दोन्ही घोषणा हवेतच विरल्याचे स्पष्ट झाले आहे.

धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या दौऱ्यात ‘गुलमोहर’ या शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये ही रोकड सापडली होती. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर ही खोली आरक्षित करण्यात आली होती. हे प्रकरण उघडकीस येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

अनिल गोटेंनी काय आरोप केले होते…

धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या अंदाज समितीच्या आमदारांना पाच कोटी रुपये वाटण्यासाठी हे पैसे आणण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांना अटक करून त्यांचे निलंबनही करण्यात आले.

विधिमंडळात तीव्र पडसाद

विधिमंडळाच्या अधिवेशनात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. विरोधी सदस्यांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची एसआयटी नेमण्याची घोषणा केली होती, पण अनिल गोटे यांनी या समितीवर अविश्वास व्यक्त केला होता. धुळय़ातील रोकड प्रकरणाची चौकशी पारदर्शीपणे होण्यासाठी धुळय़ाचे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सनदी अधिकारी तुकाराम मुंव प्रवीण गेडाम यांचा समावेश असलेली स्वतंत्र आणि विश्वासार्ह समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली. या मुद्दय़ावरून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनीही धुळे दौऱ्यात या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले होते. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली होती.

यामध्ये अद्याप एसटीआयटी स्थापन झालेली नाही आणि त्याविषयाची चर्चासुद्धा आता होताना दिसत नाही. – अनिल गोटे, माजी आमदार