आनंद मठाला स्वतःचे नाव दिले तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे गेले? राजन विचारे यांचा गद्दारांना सवाल

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे हे ठाणेकरांचे दैवत आहे. पण धर्मवीरांच्या नावाखाली गद्दार लोक राजकारण करीत असून हिंदुत्वाच्या बाता मारत आहेत. दिघे यांनी आनंद मठाला कधीही स्वतःचे नाव दिले नाही. पण गद्दारांनी मात्र आपले नाव देऊन त्यावर कब्जा मिळवला. याच आनंद मठामध्ये नोटादेखील उडवण्यात आल्या तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे होते, असा थेट सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे.

ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विचारे यांनी गद्दारांवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले की, ‘ध’ चा ‘मा’ करून काही जण राजकारण करीत आहेत. ठाणे शहरात वाहतूककोंडी, खड्डे, कचरा यांसारखे अनेक प्रश्न आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान क्रिकेटची मॅच झाली तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे होते? सोमवारीदेखील दोन्ही देशांची मॅच होत आहे. हिंमत असेल तर ती मॅच थांबवा, असे आव्हान खासदार राजन विचारे यांनी दिले.

धर्मवीर आनंद दिघे असते तर त्यांनी गद्दारीला कधीच थारा दिला नसता. सध्या ठाण्यात हेच गद्दार मोकाट झाले असून त्यांना धर्मवीरच शिक्षा करतील असे राजन विचारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दिघे यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी ठाण्याची वाट लावली आहे. ठाणेकर जनता येत्या निवडणुकीत या ढोंग्यांना धडा शिकवेल असा विश्वास विचारे यांनी व्यक्त केला.

…तर त्यांना चाबकाने फोडले असते

मूळ शिवसेना सोडून ठाण्यातील काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी गद्दारी केली. आनंद दिघे हे हयात असते तर त्यांनी या गद्दारांना चाबकाने फोडले असते, असे राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गद्दारांच्या गटातील एक खासदार पूर्वी काँग्रेसमध्ये जाणार होता. पण तिथे तो गेला असता तर त्याला फडके मारायलाही ठेवले नसते असा टोला त्यांनी लगावला.

प्रवेशद्वार, स्मारकाचे काय?

ठाणे शहरात पूर्वी आनंद दिघे यांच्या नावाचे प्रवेशद्वार होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहे. अजूनही हे प्रवेशद्वार बांधलेले नाही. धर्मवीरांचे स्मारकदेखील उभारण्याचे आश्वासन दिले होते. प्रवेशद्वार आणि स्मारकाचे काय झाले? असा सवाल शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर आदी उपस्थित होते.