ग्राऊंड लेव्हलला जाऊन डुप्लीकेट मतदार शोधा, राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

आगामी नगरपालिका, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ आणि कल्याण शहराला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दोन्ही ठिकाणी घेतलेल्या मार्गदर्शन मेळाव्यात त्यांनी डुप्लिकेट मतदार शोधण्यासाठी ग्राऊंड लेव्हलवर जाऊन मतदार याद्या तपासण्याचे निर्देश दिले.

अंबरनाथ येथील पनवेलकर सभागृहात तर कल्याणमधील गुरुदेव ग्रँड हॉटेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. दोन्ही मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीला ल ागण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी निवडणुका जिंकायच्या असतील तर मतदार याद्यांचा सविस्तर अभ्यास करा, डुप्लिकेट मतदार शोधण्यासाठी प्रत्येक प्रभागातील बूथ लेव्हल अधिकाऱ्याला शोधून मतदार याद्या तपासा, असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. ५ ऑक्टोबरनंतर मतदार यादीसंदर्भात शिबीर आयोजित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अभिजित पानसे, माजी आमदार राजू पाटील, प्रकाश भोईर, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात एक कोटी मतदार वाढले

आगामी महापालिका निवडणुकीत सर्वप्रथम मतदार यादीवर काम करण्याची आवश्यकता सांगताना राज ठाकरे यांनी राज्यात एक कोटी नवीन मतदार वाढले असल्याच्या मुद्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे मतदारांची योग्य माहिती मिळवून तिचा सखोल अभ्यास करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.